

मालवण : मालवण सागरी किनारपट्टीवर विनापरवाना मासेमारी करणारी कर्नाटक राज्यातील हायस्पीड ट्रॉलिंग नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने ताब्यात घेतली आहे. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत ही नौका जप्त करून ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली.
राज्याच्या सागरी हद्दीत घुसून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर विनापरवाना मासेमारी करणार्या हायस्पीड व पर्ससीन नौकांवर कठोर कारवाईचे आदेश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले आहेत. या अनुषंगाने अश्या नौकांवर मत्स्य विभागाकडून सातत्याने कारवाई सुरू आहे.
बुधवार 24 सप्टेंबर रोजी पहाटे मालवण समुद्रात सुमारे 10 सागरी मैल अंतरात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहा. मत्स्य. विकास अधिकारी व सहकारी नियमित गस्त घालत होते. त्यावेळी कर्नाटक राज्य जलधी क्षेत्राचा परवाना असलेली श्री. किशन, रा. कुमठा, उत्तर कानडा, राज्य कर्नाटक यांची ‘श्री शिवतेजा’ ही नौका मालवण समुद्रात अनधिकृत मासेमारी करताना सापडून आली.
गस्ती अधिकार्यांनी ही नौका आतील साहित्य व खलाशांसह जप्त करून ती सर्जेकोट बंदरात नांगरून ठेवण्यात आली.