

तिन्ही बसस्थानकांच्या इमारती जीर्ण
हायवेवरील बसस्थानकांना प्राधान्य
अंमलबजावणीकडे लक्ष
अजित सावंत
कणकवली : राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर उपयोग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्गचा विचार करता मुंबई-गोवा महामार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कणकवली बसस्थानकासह तळेरे आणि सावंतवाडी या तीन बसस्थानकांचा ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्त्वावर विकास केला जाणार आहे.
यामध्ये या तिन्ही बसस्थानकांतील जागा महामंडळाच्या आवश्यक गरजांसाठी वापरून उर्वरित जागा व्यापारी तत्त्वावर भाडेपट्ट्याने दिली जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग एसटी विभागाचे विभागीय अभियंता अक्षय केंकरे यांनी दिली.
आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य परिवहन महामंडळास तब्बल 10 हजार कोटींचा तोटा सोसावा लागत आहे. या संकटातून परिवहन महामंडळाला बाहेर काढण्यासाठी महामंडळाच्या ताब्यातील अतिरीक्त जमिनीचा व्यापारी तत्त्वावर उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 2001 मध्ये आणण्यात आलेल्या धोरणात भाडे कराराचा कालावधी 30 वर्ष होता, त्यानुसार महामंडळाने 2016 पर्यंत 45 प्रकल्प ‘बांधा, वापरा, हस्तांतरीत करा’ या धोरणानुसार राबविले. याच धोरणानुसार आणखीन 13 ठिकाणी बसस्थानके उभारण्याचे प्रस्तावित होते, पण त्याला पनवेल व छत्रपती संभाजीनगर वगळता प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे 2024 मध्ये नवीन धोरण आखण्यात आले. त्यामध्ये धोरणात भाडेपट्टा कराराचा कालावधी 30 वर्षावरून 60 वर्षे करण्यात आला. मात्र त्यालाही उद्योजकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महामंडळाच्या जमिनींचा व्यापारी तत्वावर व्यवहार्य व्हावा यासाठी भाडेपट्टा कराराचा कालावधी 60 वर्ष ऐवजी आता 98 वर्षे करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत कणकवली बसस्थानक व आगार मिळून 30 हजार 800 चौ.मी., सावंतवाडी बसस्थानक व आगार मिळून 14 हजार 591 चौ.मी. आणि तळेरे बसस्थानकाकडे 6 हजार 300 चौ.मी जागा आहे. सद्यस्थितीत या ही तिन्ही बसस्थानकांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ही तिन्ही बसस्थानके बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर विकसीत केली जाणार आहेत. यापैकी कणकवली बसस्थानकाकडे तुलनेत अधिक जागा उपलब्ध आहे. शासनाच्या धोरणानूसार बसस्थानकाची इमारत, प्रशासकीय कार्यालय, प्रवाशी बैठक व्यवस्था, स्वच्छता गृह, कॅन्टींन, वर्कशॉप, 16 प्लॅटफॉर्म व अन्य आवश्यक गरजा भागवून उर्वरीत जागा व्यापारी तत्वावर भाडे तत्वावर दिली जाणार आहे. यामध्ये संबंधित उद्योजक जागा उपलब्ध असेल तर जागा अन्यथा वाढीव एफएसआय त्याला दिला जाणार आहे.
कणकवली बसस्थानक इमारतीला 50 वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. सावंतवाडी बसस्थानकाचीही तिच स्थिती आहे. 2014 ते 2019 या युतीशासनाच्या काळात सावंतवाडी बसस्थानक इमारतीसाठी साडेचार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामध्ये केवळ आगाराच्या इमारतीचे काम झाले, मात्र बसस्थानकाची इमारत जीर्णच आहे. तळेरे बसस्थानकाची इमारतही जीर्ण झाली आहे. त्यामुळे शासनाच्या या नव्या धोरणात कणकवली, सावंतवाडी आणि तळेरे या तिन बसस्थानकांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गातील अन्य बसस्थानकांचा विचार करता कुडाळ, मालवण या ठिकाणी नवीन बसस्थानके उभारण्यात आली आहेत. तर देवगड, वेंगुर्ले या बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. वैभववाडी बसस्थानक इमारतीसाठी दीड कोटीचा निधी मंजुर झाला असून, याबाबतचा शासन निर्णय झाला आहे. कुडाळच्या महामार्गावरील बसस्थानकाकडे काही प्रमाणात अतिरीक्त जागा आहे. परंतु, त्याठिकाणी सीएनजी पंप व अन्य कारणांसाठी ती जागा वापरली जाणार आहे. वेंगुर्ले बसस्थानकाकडे सध्या सद्यस्थितीत 18 गुंठे जागा विनावापर आहे, तर विजयदुर्ग आगार येथेही 21 गुंठे जागा उपलब्ध असल्याचे विभागीय अभियंता अक्षय केंकर यांनी सांगितले.