

कणकवली : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त कणकवली तालुका पत्रकार संघाचा वृक्षारोपण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. पत्रकार संघाने फोंडाघाट येथे वृक्ष लागवडीचा उपक्रम घेत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कणकवली तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जोपासणारे काम करीत आहे. पर्यावरणाचा समोतल राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्ष लागवड करून वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याचे काम सर्वांनी करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही वनविभागाची आहे,असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त कणकवली तालुका पत्रकार संघ, वनविभाग, फोंडाघाट एज्यु. सोसासटी यांच्या विद्यमाने न्यू. इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपण उपक्रम आयोजित झाला. याप्रसंगी श्री. तोरस्कर बोलत होते. मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, कणकवली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, फोंडाघाट एज्यु. सोसायटी चेअरमन राजू पटेल, सचिव श्री. लिग्रज, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे, वनरक्षक धु. रा. कोळेकर, श्रीकृष्ण परिट, मुख्याध्यापक प्रकाश पारकर, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, जि. प. माजी सभापती संदेश सावंत-पटेल, ज्येष्ठ पत्रकार भाई चव्हाण, रमेश जोगळे, नंदू कोरगावकर, महेश सरनाईक, अजित सावंत आदी उपस्थित होते.
सुहास पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला यंदा 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. कोकणासाठी 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट सर्व विभागांतर्फे पूर्ण करण्याचा संकल्प केलाआहे.
राजू पटेल म्हणाले, कणकवली तालुका पत्रकार संघ विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. त्यांच्या उपक्रमांचे अनुकरण सर्वांनी करावे. पत्रकार केवळ बातम्या न करता सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजोपयोगी उपक्रम राबवतात,ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
गणेश जेठे म्हणाले, कोकणातील रायवळ आंबा, जांभूळ यासारख्या फळ पिकांची झाडे लुप्त होत आहेत. या लुप्त होणार्या झाडांची लागवड सर्वांनी केली पाहिजे. कोकणात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या संपदचे संरक्षण करण्याची जाबाबदारी कोकणवासीयांची आहे.
प्रास्ताविकात भगवान लोके म्हणाले, राज्यात व जिल्ह्यात आदर्शवत ठरतील, असे वनराई बंधारे, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता मोहीम, पत्रकारांचे स्नेहसंमेलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यासारखे विविध उपक्रम जातात. छत्रपती शिवाजी महाराज व आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मान्यवरांचे स्वागत प्रकाश पारकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश सरनाईक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
फोंडाघाट एज्युकेशन सोसासटीच्या न्यू. इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात पर्यावरणाचा संवर्धनाचा संदेश देत कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने कल्पवृक्ष, आंबा, चिकू, पेरू, औषधी वनस्पती व विविध प्रकाराचे वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लागवड केलेली वृक्षांची रोपे जगवण्याचा संकल्प करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांवर वृक्षांची संगोपन करण्यासाठी दत्तक योजना राबविण्याचे ठरले.