सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर गणेश भक्तांचे पुष्पगुच्छ, चहा- बिस्किट देत स्वागत

गणेश भक्त
गणेश भक्त

खारेपाटण : पुढारी ऑनलाईन : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त अनेक चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण टाकेवाडी येथे गौरी – गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणातून येणाऱ्या मुंबईकर चाकरमानी तथा गणेश भक्तांसाठी स्वागत कक्षा उभारण्यात आला. या स्वागत कक्षाचा शुभारंभ आज सोमवार (दि. १८) खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी अमित घाडीगावकर, शैलेश कांबळे, खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत, विद्यमान उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य किरण कर्ले, सौ. दक्षता सुतार, खारेपाटण प्रा. आ. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीम डॉ. प्रिया वडाम, देवानंद ईसवलकर,बंटी गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

खारेपाटण येथे गणेश भक्तासाठी उभारण्यात आलेल्या भव्य अशा स्वागत कक्षात आरोग्य पथक, पोलीस मदत केंद्र, चहा, पाणी, बिस्कीट स्टॉल, विश्रांती कक्ष फोटो गॅलरी आदी सुस्जज सोयींनी युक्त असलेले स्वतंत्र वेगवेगळे एकूण ५ कक्ष उभारण्यात आले आहे. यामध्ये चोवीस तास पथक कार्यरत राहणार आहेत. तसेच मुंबईवरून येणाऱ्या चाकरमानी तथा गणेश भक्तासाठी वातानुकूलित रेडीमेड शौचालय देखील उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. तसेच या कक्षात जिल्ह्याची पर्यटन दृष्ट्या माहिती देणारे फलक देखील लावण्यात आले आहेत.

गणेश भक्तांसाठी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे उभारण्यात आलेल्या या सेवेचा मुंबईकर चाकरमानी तथा गणेशभक्तांनी घ्यावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news