

विवेक गोगटे
आडेली : सध्या पितृपक्ष सुरू आहे. यानिमित्त घरोघरी श्राद्धविधी श्रद्धेने केले जातात. या श्राद्धविधीमध्ये ‘दर्भा’ला अनन्य साधारण महत्त्व आहे, कारण ‘दर्भा’शीवाय पिंडदान पूर्णत्वास जात नाही. मात्र या ‘दर्भा’चे अस्तित्व दुर्मिळ होत असल्याने ‘दर्भा’चे जतन व संवर्धन करण्याची गरज आहे.
‘दभर्र्’ हे एक प्रकारचे रानगवत आहे. ते ओलसर ठिकाणी उगवते. भुरीमूल (अनेक मुळ्यांचा), कुश, सहस्त्रपर्ण अशी काही या ‘दभर्र्’गवताची स्थानिक नावे आहेत. हे गवत ओळखणे कठीण असते. अनेक गवतांच्या प्रजातीमधून ‘दर्भ’ गवत केवळ तज्ज्ञ व्यक्ती, शेतकरी अचूक ओळखतात.
पितृपक्षातील श्राद्धकार्यातच नाही तर शुभकार्यातही ‘दर्भा’चा वापर केला जातो. पुराणातील काही संदर्भानुसार ‘दर्भा’ची निर्मिती ब्रह्मदेवाच्या रोमा (केसा) पासून झाल्याचे सांगितले जाते. ‘दर्भा’च्या माध्यमातून देण्यात आलेले जल थेट पितरांपर्यंत पोहोचते, अशी लोकमान्यता आहे. म्हणूनच ‘दर्भा’च्या समावेशाशिवाय श्राद्ध विधीचे पुण्य प्राप्त होत नाही असे म्हटले जाते.
अथर्ववेदात ‘दर्भा’बद्दल काही उपयोग सांगितले आहेत. ‘दर्भा’चे खोड आणि फांद्या उत्तेजक मूत्र साफ करणार्या असून कोकणात इतर औषधांबरोबर त्याचा काढा करून तो अमांशावर वापरतात. ‘दर्भा’च्या मुळ्या थंडावा देणार्या असतात तसेच दोर बनविण्यास ‘दर्भा’चे धागे वापरतात. बदामी कागद बनविण्यासाठी ‘दर्भा’च्या धाग्यांचा उपयोग होतो. ‘दर्भा’च्या चटया सुद्धा तयार करण्यात येतात. ‘दर्भा’ ची शेती केली तर अनेक बेरोजगार तरुणांना अर्थार्जन होऊ शकते. वर्षभर हे ‘दर्भ‘ अनेक धार्मिक विधींमध्ये वापरला जातो. कित्येक वेळा हा ‘दर्भ’ यजमानांना सहज उपलब्ध होत नाही. कोकण प्रांतात या ‘दर्भा’चे अस्तित्व अत्यंत दुर्मिळ होत आहे. त्यामुळे गावागावातील पुरोहित पूजा साहित्य खरेदी- विक्री केंद्रातून याची खरेदी करताना दिसून येतात.