

हरकुळखुर्द : केंद्रशाळा हरकुळखुर्द नं.1 च्या विद्यार्थी व शिक्षकांनी क्षेत्रभेट म्हणून हरकुळखुर्द गावातील निसर्गरम्य लघुपाटबंधारे तलावाला भेट दिली. या भेटी दरम्यान तलाव परिसरात पर्यटकांनी टाकलेला प्लास्टिक कचरा साफ करत स्वच्छतेचा संदेश दिला.
हरकुळखुर्द तलाव परिसरात नेहमीच पर्यटकांची येजा असते. मात्र काही पर्यटक खाण्या पिण्यासाठी वापरेल्या प्लास्टिक बाटल्या, ग्लास, पत्रावळी, पॅक बंद खाऊची वेष्टने आदी प्लास्टिक व कचरा तलाव परिसरात फेकून देतात. तसेच उरलेले अन्नही परिसरात टाकतात.यामुळे तलाव परिसरात गलिच्छपणा आला होता, तसेच दुर्गधीही पसरली होती. प्लास्टिक पिशव्यांमधून उरलेले अन्न व खाद्य पदार्थ टाकल्याने अशा पिशव्या परिसरातील पाळीव जनावर खात होती.
ही परिस्थिती पाहून तलाव परिसराला भेट देणेसाठी गेलेल्या शाळा नं.1 च्या विद्यार्थी व शिक्षकांनी हा कचरा गोळा करण्याचे ठरवले. यानुसार तलाव व धबधब्या परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. मुख्याध्यापिका सौ.सीमा दळवी, सौ.पूजा मुंडले, सदानंद गावकर, श्री.शिरसाट व विद्यार्थ्यांनी या स्वच्छतेच्या कामात भाग घेतला.
यावेळी शाळा नं.1 च्या मुख्याध्यापिका सीमा दळवी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी तलाव परिसरात उपस्थित पर्यटकांना परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन केले. येथील तलाव परिसराचा, धबधब्याचा , निसर्ग सौदंर्य याचा मनमुराद आनंद घ्या. मात्र सोबत आणलेले पदार्थ, कचरा टाकून परिसराचे सौंदर्य विद्रूप करू नका. परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत व सहकार्य करा, असे आवाहन केले.