

डोंबिवली (ठाणे) : 'शालेय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला : अंबरनाथनंतर कल्याणमध्ये टेम्पोतून वाहतूक' या मथळ्याखाली दैनिक पुढारीने मंगळवार १५ जुलैच्या अंकात सचित्र वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची परिवहन विभागाने तात्काळ गंभीर दखल घेतली आहे. कल्याणातील एका खासगी शाळेत चिमुरड्या विद्यार्थ्यांची ने-आण करणारा टेम्पोवाला चांगलाच अडचणीत आला आहे. सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता विद्यार्थ्यांना क्रूर वागणूक देणाऱ्या या टेम्पोच्या मालक वजा चालकाला आरटीओ तब्बल १४ हजारांचा दंड ठोठावला तर आहेच, शिवाय त्याच्या ताब्यातून टेम्पो देखिल जप्त करण्यात आला आहे.
कल्याण पूर्वेकडील पत्रीपूल परिसरात असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुरड्यांची वाहतूक चक्क मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकी टेम्पोतून केली जात होती. शाळेत ने-आण करणाऱ्या या टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कोणतीही योग्य आसनव्यवस्था नाही. दरवाजे पूर्णपणे बंद होत नसलेल्या या टेम्पोत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एकही अटेंडंट (सहाय्यक) नव्हता. लोखंडी पट्ट्या आणि लटकलेल्या दोऱ्या धरून उभे राहून, तर काही विद्यार्थी फाळक्यावर बसून प्रवास करत असत. जर हा टेम्पो भरधाव वेगात असताना थोडासाही असंतुलित झाला तर हे निष्पाप विद्यार्थी थेट रस्त्यावर फेकले जाऊन भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सचित्र वर्णन दैनिक पुढारीने सदर वृत्तात केल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.
एम एच ०५/ इ एक्स /१७३४ क्रमांकाच्या टेम्पोचा चालक/मालक सोनल प्रसाद हा कल्याणातील नेतीवली परिसरात राहतो. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी मालवाहतुकीच्या टेम्पोतून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला शोधून त्याच्यावर कारवाई करण्याचे फर्मान सोडले होते. त्यानुसार इंद्रजित आमटे, रोहित पवार, निलेश अहिरे, प्रसाद खारगे यांनी शोध मोहीम राबवून सोनल प्रसाद याला डोंबिवलीत पकडले. आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनाच्या बॉडी प्रकारात बदल करणे. माल वाहनातून प्रवासी वाहून नेणे, असा अपराध केल्याच्या आरोपावरून या टेम्पोचा चालक सोनल प्रसाद याला ऑन द स्पॉट २४ हजार रूपयांचा दंड ठोठावला. शिवाय त्याच्या ताब्यातून टेम्पो देखिल जप्त केला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्या संदर्भात लक्षवेधी परिपत्रक जारी केले आहे. हे पत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकरीता स्कुलबस धोरणानुसार महाराष्ट्र मोटार वाहन (स्कुल बसकरिता विनियम) नियम २०११ दिनांक २२/०३/२०११ प्रमाणे जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक शाळेमध्ये शालेय स्तरावर शालेय परिवहन समिती गठीत करणे बंधनकारक आहे. शालेय समितीचे अध्यक्ष हे मुख्याध्यापक/प्राचार्य, शिक्षण विभागाचे अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी, शालेय वाहन चालक संघटनेचे प्रतिनिधी, शिक्षक व पालक हे सदस्य म्हणून समितीमध्ये असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदस्य, जिल्हा स्कुलबस सुरक्षितता समिती, ठाणे ग्रामीण तथा शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक शाळांमधील शालेय परिवहन समितीची माहिती अद्यावत व संकलित करून ठेवण्याच्या सुचना ठाणे जिल्हास्तरीय बैठकीत अध्यक्षांनी वेळोवेळी दिल्या आहेत. याकरिता आपल्या परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शालेय परिवहन समितीची सर्व माहिती, जसे की, शालेय वाहनांचे नोंदणी क्रमांक, वाहनांची एकूण संख्या, वाहनातील महिला सहवर्ती व वाहनचालकाचे नाव/पोलिस चरित्र पडताळणी दाखला, वाहनाच्या सर्व वैध कागदपत्रांचा तपशिल, वाहनाचा मार्ग, शालेय वाहन थांब्यांची नावे, विद्यार्थ्यांच्या नावाची यादी, शालेय परिवहन समितीतील सदस्यांची नावे याची इत्यंभूत माहिती संकलित करुन ठेवण्यात यावी. तसेच आजपर्यंत आपलेकडे उपलब्ध असलेली माहिती सदस्य/सचिव, जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समिती तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पुरविण्यात यावी, अशीही सूचना आशुतोष बारकुल यांनी सदर पत्रकात केली आहे.