आचरा : कोकणात अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणी, भुईमूग काढणी झाली की गुराख्यांना 'गवळदेवा'चे वेध लागतात. ही परंपरा म्हणजे गावाचा सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणारा व पर्यावरण पुरक जीवनाचे शिक्षण देणारा आगळावेगळा स्नेहभोजनाचा सोहळा असतो. एकमेकांच्या सहकार्याने होणारे ग्रामस्थ व गुराख्याचे हे एक जणू स्नेहसंमेलन असून हा कोकणचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे.
निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ असल्याचे भारतीय संस्कृती सांगते. म्हणूनच कुठलेही काम, व्यवसाय निसर्गपूरक असावे, अशी शिकवण भारतीय संस्कृती देते. म्हणूनच भारतातील सण, उत्सव हे पर्यावरण स्नेही आहेत. जंगलात चरणारी गाई- गुरे व गुराख्याचे हिंस्त्र पशुंपासून संरक्षण व्हावे, यासाठी निसर्ग देवतेला व जंगलाच्या राजाला (वाघाला ) साकडं घालण्याचा हा कार्यक्रम आहे. भगवान श्री कृष्णाने ही परंपरा सुरू केल्याचे सांगितले जाते. आज घरोघरी गुरांची संख्या फार कमी होत असली तरी आचरे गावात ही 'गवळदेव' परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते. आचरा-देउळवाडी येथील शेतकऱ्यांनी (गुराख्यानी) रविवारी (दि,३) दुपारी आचरा-नागोचीवाडी येथे जात गवळदेवचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. कार्यक्रमात आचरे गावातील अबालवृद्धापासून ते बाल गोपाळापर्यंत साऱ्यांनीचं सहभाग घेतला होता.
वाडी- वस्ती लगत जंगलात, डोंगराळ भागात नदी किंवा पाणवठयाच्या ठिकाणी हा उत्सव प्रामुख्याने होतो. सर्व गुराखी, शेतकरी, लहान थोर मंडळी गवळदेवाच्या ठिकाणाची साफसफाई करतात. तुळशी वृंदावनाची डागजुगी केली जाते. तेथील देव-देवतांची पूजा केली जाते. मातीचा किंवा शेणाचा वाघोबा तयार केला जातो व त्याची पूजा केली जाते. सर्व गावकरी एकत्र येत डाळ, भात, भाजी, खीर ,सोलकडी असे जेवण तयार करून तेथील असलेली देवदेवता, गवळदेव, वाघोबा, यांना नेवैद्य दाखविला जातो. नंतर सर्व गुराखी, शेतकरी, लहान मुले एकत्र केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर जेवण घेऊन एकत्र बसून वनभोजनाचा आस्वाद घेत कार्यंक्रमाचा आनंद लुटतात.
गुराढोरांची रोगराई व हिंस्त्र प्राण्यांपासुन रक्षण करण्यासाठी व धनधान्य, दुग्धजन्य उत्पादनाच्या बरकतीसाठी देवाकडे साकडे घातले जाते. तेथील देवतेचा कौल लावला जातो. लहान मुलाला वाघ बनवून त्याची प्रतिकात्मक वाघाची पिटाई करून या कार्यक्रमाची सांगता होते. निसर्गाचं सहभोजन घेण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा वसा आणि वाघाला देव मानण्याची परंपरा हे आचरे गावचे गावपण टिकवून ठेवण्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.
हेही वाचा :