पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बांधकाम मजुरांच्या डोक्यावर हेल्मेट नाही, पायात गमबूट, हॅन्डग्लोव्हज नसणे, काम सुरू असताना कमरेला सीटबेल्ट नसणे, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा जाळी नसणे अशा विविध बाबी मंगळवारी (दि. 5) दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. त्यामुळे बांधकाम मजुरांची सुरक्षितता वार्यावर आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी मात्र, कर्मचार्यांनी ही सुरक्षा साधने घातली असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
कोथरुड येथे पडदी बसविण्याचे काम करत असताना पहिल्या मजल्यावरुन खाली पडल्याने नुकताच एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. त्यामुळे बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात बांधकामांच्या ठिकाणी नेमकी काय स्थिती आहे, याची दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता बर्याच बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम मजुरांची पुरेशी
सुरक्षितता घेतली जात नसल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेकडे सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने बांधकाम कामगारांच्या बाबतीत ही परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. बांधकाम उद्योगात सर्वात जास्त असंघटित कामगार आहेत. राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना केलेली आहे. बांधकाम कामगारांमध्ये गवंडी, सेंट्रिंग, सुतार, प्लंबर, फरशी कामगार, पॉलिश, वेल्डर, पेंटर यांच्यासह 18 कामगारांचा समावेश होतो. गवंडी, सेट्रिंग, पेंटर, फरशी फिटिंग करणार्या कामगारांसह अन्य कामगारांना प्रशिक्षण दिले जात नाही. मजुरी करतच हे कामगार शिकत असतात. त्यामुळे कामावर सुरक्षितता कशी बाळगावी, याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. पण बांधकामाच्या साईटवरील विकसक, अभियंता यांनी सुरक्षिततेचे ज्ञान घेतलेले असते. त्यामुळे किमान त्यांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.
बांधकाम मजुरांच्या सुरक्षा साधनांसाठी कामगार खात्याकडे असलेल्या निधीचा पुरेपुर वापर व्हायला हवा. बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी हा पैसा वापरला गेला पाहिजे. विकसकाने बांधकाम प्रकल्पाचा विमा काढावा. कामगारांचा अपघाती मृत्यू होऊ नये, यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा साधने असल्याशिवाय बांधकाम मजुरांना प्रवेश देऊ नये. ज्या मजुरांकडे ही सुरक्षा साधने नसतील त्यांना ती विकसकाने उपलब्ध करुन द्यावी.
– बाबा कांबळे,
संस्थापक-अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत
बांधकाम कामगारांनी कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केली असल्यास त्यांना सुरक्षा साधने मिळतात. त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांनी त्यासाठी नोंदणी करून घ्यावी. या कामगारांकडे सुरक्षा साधने नसतील तर ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही कंत्राटदार आणि आस्थापनांची आहे.– काशिनाथ नखाते, कामगार नेते.
हेही वाचा