

अजित सावंत
कणकवली : कोकणवासीयांच्या श्रध्दा आणि भक्तीभावाचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाची उत्कंठा सर्वांनाच असते. या उत्सवासाठी नोकरी धंद्यानिमित्त मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी विखुरलेली कोकणी माणसे आवर्जुन आपल्या गावी येतातच. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्टय आहे ते म्हणजे कोकणच्या गणेशोत्सवाने कोकणातील एकत्र कुटुंब पध्दत आजही टिकवून ठेवली आहे. सर्वांच्या एकत्रित येेण्याने कुटुंबा-कुटुंबातील स्नेहभाव दृढ करण्याचे काम हा गणेशोत्सव करत आहे. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंबांची संख्या वाढत असताना कोकणवासीयांनी मात्र पूर्वजांनी घालून दिलेला एकत्र कुटुंब पध्दतीचा वसा जपला आहे.
कोकणी माणूस आणि गणेशोत्सव यांचे एक वेगळे नाते आहे. मुंबईकर चाकरमान्यांसह गाववाल्यांना वर्षभर या उत्सवाची ओढ लागून राहिलेली असते. कोकणातील मंडळी मोठ्या संख्येने मुंबईला वास्तव्यास आहेत. चाकरमानी म्हणून त्यांची आजही ओळख आहे. कोकणच्या गणेशोत्सवाला प्रत्येक घराघरात चाकरमानी मंडळी दाखल होतात. चाकरमानी गावागावांत दाखल झाले की खर्या अर्थाने उत्साहाला उधाण येते.
कोकणात वर्षानुवर्षापासून एकत्र कुटुंब पध्दती अस्तित्वात आहे. पूर्वी दोन भाऊ गावी शेतीला असले तर दोन भाऊ मुंबईला नोकरीला असत. गावचा भाऊ शेतीवाडी सांभाळायचा आणि मुंबईकर चाकरमानी त्याला आर्थिक मदत म्हणून मनीऑर्डर करायचा. अलीकडे 15-20 वर्षांपर्यंत कोकणचे अर्थकरण हे चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवर अवलंबून होते. गावागावात एकत्र कुटुंबे होती. कालौघात हे प्रमाण काहीसे घटले असले तरी कोकणात आजही अनेक एकत्र कुटुंबे सुखासमाधानाने नांदत आहेत. अर्थात पूर्वी एवढी माणसे आता गावी नसली तरी गणेशोत्सवाला चाकरमानी मंडळी गावी आली की, एकत्र कुटुंब पध्दत तेवढ्याच स्नेहभावाने जोपासतात.
गणपती बाप्पा जणू या सर्व कुटुंबातील माणसांना स्नेहभावाच्या धाग्याने एकत्र बांधतो. आजही जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचा गणपती एक आहे. काही कुटुंबांमध्ये वर्सल पध्दत असली तरी वर्सल कोणाचीही असो सगळे एक विचाराने हा उत्सव साजरा करतात. त्या त्या बिर्हाडातून बाप्पांचा नैवेद्य केला जात असला तरी सर्वजण मात्र एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात. या उत्सवामुळे लहानापासून थोरांपर्यंत सर्वजण एकत्र येतात. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. विचारांची देवाणघेवाण होते. एकूणच बाप्पांच्या उत्सवामुळे कुटुंबाचे ‘गेटटुगेदर’ होते. अलीकडच्या काळात नव्या पिढीत ‘हम दो, हमारे दो’ हि विचारसरणी पुढे येत असताना कौटुंबिक एकोपा टिकवण्याचे काम गणपती बाप्पांचा उत्सव नक्कीच करतो आहे. बाप्पांच्या आशिर्वादाबरोबरच एकत्र कुटुंबातून मिळालेला आनंद आणि उर्जा नक्कीच चाकरमान्यांबरोबरच इथल्या कोकणी माणसाला बळ देत असते, बळ देत राहणार यात शंका नाही.
सिंधुदुर्गात मोठ्या कुटुंबांचे अनेक गणपती आहेत. कालौघात घरे वेगवेगळी झाली तरी गणपती मात्र एका ठिकाणीच मुळ घरात असतो. एखाद्या कुटुंबांमध्ये चार बिर्हाडे, काही कुटुंबांमध्ये सहा बिर्हाडे असतात तर काही कुटुंबांमध्ये दोन बिर्हाडे असतात. अशा बिर्हाडांमध्ये त्या त्या वर्षांच्या गणेशोत्सवाची खर्चाची जबाबदारी ठरलेली असते. त्यालाच मालवणी भाषेत वर्सल असे म्हणतात. रोटेशन प्रमाणे हि वर्सल येते. ज्याच्याकडे वर्सल असते ते बिर्हाड त्या वर्षाचा गणेशोत्सवाचा खर्च करते. त्यामुळे गणेशोत्सवात बर्याच वेळा ‘यंदा आमची वर्सल आसा... गणपती बघुक येवा’ असे सांगितले जाते. त्यामुळेच विविध अंगांनी कोकणचा गणेशोत्सव हा आगळा वेगळा ठरला आहे.