

वेंगुर्ले : पोलिस असल्याची बतावणी करून रस्त्यावरून जाणार्या वृद्ध नागरिक आणि महिलांचे दागिने लुटणार्या आंतरजिल्हा भामट्याला जेरबंद करण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. अबूतालीब मुसा इराणी (वय 31, रा. इराणी वस्ती, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला सांगलीतून ताब्यात घेण्यात आले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या संशयितावर वेंगुर्ला पोलिस ठाण्यात 4 ऑगस्ट 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी सावंतवाडी पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. दोन्ही ठिकाणी पोलिस असल्याचे भासवून अज्ञाताने पादचारी वृद्ध आणि महिलांचे दागिने लंपास केले होते. या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढला असता, तो सांगली येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, एलसीबीच्या पथकाने सांगलीत चार दिवस तळ ठोकून कसून शोध घेतला. अखेर विश्रामबाग परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ संशयित अबूतालीब इराणी फिरत असताना पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यायने वेंगुर्ले व सावंतवाडी येथील गुन्हे केल्याची कबुली दिली.
त्यानंतर त्याला वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, न्यायालयाने त्याला 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.