

दोडामार्ग : मोर्ले येथे बागेत काम करणार्या एका शेतकर्याचा हत्तीने पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचार्यांची गाडी अडवून ठेवली. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी गावात येत नाहीत तोपर्यंत येथून कर्मचार्यांना माघारी सोडणार नाही, असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला.
मोर्ले येथे शेतकरी नामदेव सुतार हे शनिवारी दुपारी आपल्या काजू बागेत काम करत होते. त्यांची पत्नी व मुलगाही त्यांच्या सोबत होता. यावेळी बागेत आलेला हत्ती त्यांच्या निदर्शनास आला नाही. या हत्तीने अचानक नामदेव सुतार यांच्यावर हल्ला केला; मात्र सुतार यांनी प्रसंगावधान राखत पत्नी व मुलासह तेथून पळ काढला. यामुळे ते हत्तीच्या जीवघेण्या हल्ल्यापासून सुदैवानेच बचावले. ही घटना वन विभागाला कळविल्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वन विभागाच्या कर्मचार्यांनी हत्तीचे लोकेशन चुकीचे दाखविल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक शेतकर्यांनी केला. तसेच शासन हत्ती हटाव मोहीम राबविण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थ व शेतकर्यांनी वन कर्मचार्यांची गाडी घटनास्थळी रोखून धरली. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी यावे व आम्हाला उत्तर द्यावे, अशी आक्रमक भूमिका शेतकर्यांनी घेतली.
यावेळी मोर्लेचे उपसरपंच संतोष मोर्ये, पंकज गवस, नामदेव सुतार व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या हल्ल्याबाबत दोडामार्ग वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना विचारले असता, त्यांनी याबाबत पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलण्यास नकार दिला.
तालुक्यात गेल्या 10 वर्षांपासून हत्तींचा धुमाकूळ घातला आहे. हत्तींच्या हल्ल्या तालुक्यातील शेतकर्यांचे बळी गेले असून काही जण जायबंदी झाले आहेत. मात्र राज्य शासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी हत्ती हटावच्या केवळ पोकळ घोषणा करत आहेत. आम्हा शेतकर्यांचे आणखी किती बळी हवे आहेत? असा सवाल करत शेतकर्यांनी तीव्र संताप यक्त केला.