

दोडामार्ग : साटेली-भेडशी मुस्लिमवाडी येथे विद्युतभारीत तारांचा शॉक लागून दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. शेळ्यांचे मालक असलेले पितापुत्र यांनाही विजेचा धक्का बसला. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून ते बाल-बाल बचावले. या घटनेने महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
इलियास फर्नांडिस व त्यांचा मुलगा हे पितापुत्र शेळीपालनचा व्यवसाय करतात. सोमवारी सकाळी त्यांनी शेळ्या चरावयास नेल्या होत्या. सायंकाळी ते शेळ्या घेऊन घरी माघारी येत असताना वाटेत मुस्लिमवाडी रस्त्याशेजारी विद्युत खांबाजवळ गेलेल्या दोन शेळ्यांचा धडपडून जागीच मृत्यू झाला. या प्रकाराने इतर शेळ्या सैरावैरा पळू लागल्या. दरम्यान शेळ्या का बिथरल्या, हे पाहण्यासाठी गेलेल्या मेंढपाळ पितापुत्रांनाही विजेचा धक्का बसला. सुदैवाने ते यातून बचावले.
या घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य इस्माईल चांद यांना समजताच त्यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. साटेली-भेडशी महावितरण कार्यालयाला कल्पना देत स्थानिक वायरमनांना घटनास्थळी येण्यास पाचारण केले.
सरपंच छाया धर्णे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. वायरमन प्रितेश पेळपकर, मनोज सावंत, गोविंद गवस, सागर शिंपी यांनी घटनास्थळी येत विद्युत खांबावर वाढलेली झाडांच्या फांद्या, वेली यांची साफसफाई केली. तसेच विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती केली. विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणात झाडांच्या वेली वाढलेल्या होत्या. पावसामुळे अचानकपणे खांबातून विद्युत प्रवाह आला असावा आणि त्याच वेळी शेळ्या वेली खात असता त्यांना विजेचा धक्का लागला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. या मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा करत शवविच्छेदन केले.