

कुडाळ : आपल्या एका नातेवाईकांना सोन्याची माळ बनवायची आहे. यासाठी या माळेचा फोटो काढायचा आहे. असे सांगत सोन्याच्या माळ घेऊन गेला. मात्र परत करताना नकली सोन्याची माळ आणून देत वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची घटना साळगाव-टिळवेवाडी येथे घडली. या प्रकरणी दाखल तक्रारी नुसार सखाराम मारुती टिळवे (रा. साळगाव-टिळवेवाडी) याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 जुलै रोजी साळगाव टिळवेवाडी येथे घडली.
या घटनेची फिर्याद मंदाकिनी रामचंद्र टिळवे (77, रा. साळगाव टिळवेवाडी) यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. सखाराम टिळवे यांनी मंदाकिनी यांच्या घरी जाऊन तुझ्या गळ्यातील माळेसारखी माळ आपल्याला बनवायची असून त्याचा मला फोटो काढायचा आहे. असे सांगून तिच्या गळ्यातील माळ सखाराम आपल्याकडे घेऊन गेले. यानंतर त्यांनी अर्ध्या तासाने ती माळ परत आणून दिली. मात्र ती माळ पिवळसर असल्याने मंदाकिनी टिळवे यांना याबाबत संशय आला. खात्री केल्यावर ती माळ खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
विश्वासाने दिलेली सोन्याची माळ नेत त्या ऐवजी नकली माळ आणून आपली फसवणूक केल्याची तक्रार या महिलेने पोलिसात दिली.. सोन्याची मूळ माळ 17 ग्रॅम वजनाची असून तिची किंमत 51 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या तक्रारीनुसार सखाराम मारुती टिळवे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.