

कणकवली : रक्षाबंधन म्हणजे बहिणींच्या रक्षणाची बांधिलकी तर व्यसनमुक्तीचे बंधन म्हणजे समाजाचे व्यसनांपासून रक्षण करणे होय! असे रक्षण मंत्र्यांंकडून राज्यातील जनतेचे व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या वतीने मंत्रालयात विविध खात्यांच्या मंत्र्यांना व्यसनमुक्तीची राखी बांधण्यात आली. यावेळी समाजाचे व्यसनांपासून रक्षण करून राज्यात नशामुक्त महाराष्ट्राच्या धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी विनंती मंत्र्यांना करण्यात आली.
नशाबंदी मंडळाच्या कोकण विभागाच्या वतीने ‘व्यसनमुक्तीशी बंधन-व्यसनांपासून रक्षण’ असा संदेश देणार्या राख्या बांधण्यात आल्या. या कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, रायगड ठाणे संघटक रविंद्र गुरचळ, पालघरचे मिलिंद पाटील, मुंबई शहरच्या चेतना सावंत, मुंबई उपनगरच्या दिशा कळंबे या कोकण विभागातील व्यसनमुक्तीवर कार्य करणार्या संघटकांचा समावेश होता.
या सर्व संघटकांनी मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना वाढत्या व्यसनांना आळा घालून समाजाचे रक्षण करावे, असे आवाहन करत रक्षाबंधनाच्या निमित्ताने व्यसनमुक्तीची राखी बांधून अनोखी भेट मागितली.
तसेच सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील जनतेचे व्यसनांपासून रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारून सिंधुदुर्ग जिल्हा नशामुक्त करावा, अशी विनंती नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर आणि कोकण विभागातील संघटकांच्या वतीने करण्यात आली.