

कणकवली : शहरातसह तालुक्यात ठिकठिकाणी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यानिमित्त गागावोगावी मंदिरांमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. लाडक्या विठुराच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरांमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींना तुळशींसह फुलांनी सजविले होते. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली, असे वातावरण सर्वत्र होते. विठुराच्या जयघोषामुळे कणकवलीनगरी विठ्ठलमय झाली होती.
भाविकांसाठी आषाढी एकादशीचा दिवस पर्वणीपेक्षा कमी नाही. वारीची मोठी पंरपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये या दिवसाला मोठे महत्त्व आहे. आपल्याकडे वारीची परंपरा हजार वर्षांपासून दिसते. आषाढ महिन्यातील एकादशी ही विठ्ठल भक्तांसाठीजणू पर्वणीचं. विठ्ठल लोकदेव आहे. तो सर्वांना स्वीकारणारा आणि सर्वांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे विठ्ठल घराघरामध्ये पोहोचलेला आहे. कारण संतांनी आईच्या स्वरुपात त्याचे स्वरुप आपल्यासमोर मांडले आहे. यामुळेच एकंदरीतच कणकवली शहरासह गावोगावी असलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरात आषाढी एकदाशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. लाडक्या विठुराच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये सकाळापासून भाविकांची गर्दी झाली होती.
शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरात विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रखुमाईचा गाभारा तुळशी, फुलांनी सजविण्यात आला होता. तसेच मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हे चित्र भक्तांचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरात सकाळी विठ्ठल-रखुमाईंच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर अभिषेक करण्यात आला. विठ्ठल-रखुमाईंच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. काही दाम्पत्यांनी आपल्या पांडुरंगा चरणी अभिषेक देखील केला. दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. भजनी बुवांनी भजनने करत आपली सेवा अर्पण केली. तालुक्यातील ठिकठिकाणी विठ्ठल-रखुमाईंच्या मंदिरात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कलमठ येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री गणेश मॉन्स्टसरी प्ले स्कूल बिडयेवाडी लहान मुलांनी विठ्ठल-रखुमाईची आणि वारकर्यांची वेशभूषा केली होती. आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यात सर्वत्र विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली, असे चित्र होते. तर आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने काही शाळांमध्ये शनिवारी विठ्ठल रखुमाई वेशभूषा करत विद्यार्थ्यांनी वारीचे महत्त्व पटवून दिले. तर सोशल मीडियावर देखील आषाढी एकादशीचे शुभ संदेश देखील एकमेकांना देण्यात आले.