

दोडामार्ग : दोडामार्ग पोलिसांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारुबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करत दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दारू व जुगार साहित्य असा मिळून एकूण 5 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध दारू बाळगल्याप्रकरणी काशीराम न्हानू सुतार (वय 52, रा. घोटगेवाडी) व सुदन नारायण बोंद्रे (46, रा. साटेली भेडशी खालचा बाजार) अशी संशयितांची नावे आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
कोनाळकट्टा ते शिरंगे पुनर्वसन रोडवरील खानयाळे धनगरवाडी तिठा येथे संशयित काशीराम सुतार यांच्याकडून हनी ग्रेड ब्रँडी या लेबलची गोवा बनावटीची 180 मिली मापाच्या कंपनी सिलबंद 100 रुपये किमतीच्या 47 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (ई) नुसार कारवाई केली. साटेली भेडशी येथील धान्य गोदामाजवळ मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकली.
यावेळी संशयित सुदन बोंद्रे याच्याकडून एक कार्बन पेपरसह जुगार आकडे लिहिलेला कागद, एक वापरलेले निळ्या शाईचे बॉलपेन व 1220 रुपये रोख रक्कम हस्तगत केली. संशयित आरोपी सूदन बोंद्रे याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका जुगाराचे आकड्यांवर लोकांकडून पैसे स्वीकारून मटका जुगार खेळ खेळवत असताना मिळून आला.
त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.