

दोडामार्ग : प्लास्टिक पिशव्यांचा वापर तथा विक्री करणार्या काही दुकान व्यावसायिकांवर दोडामार्ग नगरपंचायतीने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. 13 दुकानांवर कारवाई करत एकुण 3 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईने मात्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्या व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून दोडामार्ग शहर पूर्णपणे प्लास्टिक मुक्त करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये. प्लास्टिक मुळे होणारे त्रास, आजार हे जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे प्लास्टिक पूर्णपणे बंद करा, अशी वारंवार नगरपंचायतीच्या वतीने कचरा व्यवस्थापन घंटागाडीच्या माध्यमातून नागरिकांना सूचित करण्यात येत होते. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष चेतन चव्हाण व मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी मोहीम राबवण्यात आली.
बाजारपेठेतील दुकानांत जात प्लास्टिकचा वापर करणार्या विक्रेत्यांवर कारवाई केली. यावेळी एकूण 13 दुकानांवर कारवाई केली. नागरिक व दुकानदारांनी प्लास्टिक मुक्त शहर करण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले.