Sindhudurg News | विकास प्रारूप आराखड्यातून दोडामार्ग शहराचा विकास साधणार

Town planning: अफवा व चुकीची माहितीवर विश्वास ठेवू नका; नगराध्यक्षांचे जनतेला आवाहन
Dodamarg development plan
दोडामार्ग ः पत्रकार परिषदेत बोलताना चेतन चव्हाण, देविदास गवस व नितीन मणेरीकर.pudhari photo
Published on
Updated on

दोडामार्ग ः कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत काही राजकीय पुढारी, नेते शिवाय काही लोक अफवा व चुकीची माहिती पसरवत आहेत. त्या गोष्टी पूर्णतः चुकीच्या असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. या विकास आराखड्यातून शहराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. तसेच नागरिकांचे हित जोपासूनच हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रारूप विकास आराखड्याबाबत 12 व 13 जून या दोन दिवसात नगरपंचायत येथे सुनावणी होणार असल्याचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नगरपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक नितीन मणेरीकर उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, 2017 साली जो ठराव झाला होता, त्याला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आराखड्यामध्ये लोकांच्या हिताचे काय आहे ते त्यांना समजले पाहिजे. यासाठी ही पत्रकार परिषद आहे. एवढे दिवस विकास आराखड्यासंदर्भात कोणतीच पत्रकार परिषद घेतली नव्हती. परंतु, काही नेते, पुढारी गैरसमज पसरवत आहे. नगरपंचायतने तुमच्यावर मोठे काही लादलेले आहे, नगरपंचायत तुमचं नुकसान करणार आहे, ही अफवा ज्या पद्धतीने पसरवली जात आहे ती संपूर्णतः चुकीची व खोटी आहे.

याचे निरसन करण्यासाठी ज्या लोकांच्या हरकती आहेत, यासाठी 12 व 13 तारीखला बैठक घेण्यात येणार आहे. या प्रारूप विकास आराखड्याचा ठराव 16मार्च 2017 रोजी झाला होता. त्यानंतर या आराखड्यासाठी 21 जुलै2018 रोजी मुदतवाढ मिळाली आणि या सर्व प्रोसेससाठी 5 डिसेंबर 2018 रोजी नगर रचनाकार, नगर रचना विभाग सिंधुदुर्ग यांना अस्तित्वातील जमीन वापर नकाशा तयार करून मिळण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला.

19 जानेवारी 2021 रोजी नगर रचनाकार सिंधुदुर्ग यांच्याकडून प्रारूप विकास योजना जीआयएस प्रणालीचा वापर करून तयार करण्याचा इरादा जाहीर करण्याबाबत पत्र प्राप्त झाले. त्यासाठी शासन स्तरावरून मे. टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या खासगी यंत्रणेची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नगरपंचायतच्या तत्कालीन बॉडीचा कार्यकाळ संपला आणि नगरपंचायतवर प्रशासन राजवट लागू झाली.

प्रशासन असतानाच 24 फेब्रुवारी 2021 रोजी इ.एल.यू. प्रसिद्ध करण्यात आला. त्यात रस्ते, घरे जे काय होते ते इ.एल.यू मध्ये फायनल झाले. तसे राजपत्र काढण्यात आले. साठ दिवसांमध्ये हरकती नोंदविण्याचे प्रसिद्ध पत्रक काढण्यात आले. नगर रचनाकार सिंधुदुर्ग यांची या क्षेत्राकरिता विकास योजना तयार करण्यासाठी व त्यामध्ये संपूर्ण नगरपंचायत हद्दीतील क्षेत्राचे सर्वेक्षण करणे, विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करणे साठी नगर रचना अधिकार म्हणून नेमणूक करण्यात आली आणि 2022 मध्ये तो विकास आराखडा नगररचना अधिकारी कसई -दोडामार्ग यांच्याकडे पुन्हा दुरुस्तीसाठी पाठविण्यात आला.

ही प्रक्रिया झाल्यानंतर नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी विशेष सभा घेण्यात आली. त्या सभेत या विकास आराखड्याबाबत बदल सुचविण्यात आले आणि पुन्हा त्या आराखड्याला प्रसिद्धीसाठी मंजुरी देण्यात आले. तसे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करून लोकांना हरकती नोंदविण्यासाठी 30 दिवसाची मुदत दिली. तशा नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या. त्यानुसार काही नागरिकांचे हरकती देखील आल्या आहेत. याबाबत 12 व 13 या दोन दिवसात सुनावणी घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले.

फॉरेस्ट व वनसंज्ञा नोंद ग्रामपंचायत काळातील

प्रशासन काळामध्ये जो आराखडा पूर्णत्वास आला होता. तो आपल्याकडे आल्यावर काही जणांनी मतांसाठी व लोकांमध्ये हिरो बनण्यासाठी गैरसमज पसरवले आहेत. तुमच्या जमिनीतील वन संज्ञा आणि फॉरेस्ट या नोंदी हे नगरपंचायतीने लावल्या असल्याचा गैरसमज काही जण पसरवत आहेत. मात्र यात नगरपंचायतचा काडीमात्र संबंध नाही. ग्रामपंचायत काळापासून फॉरेस्ट आणि वनसंज्ञा लागू आहे. त्यामुळे जी काही अफवा केली जात आहे ती पूर्णतः खोटी आहे.

म्हणून जनतेच्या हितासाठी हा आराखडा आमच्या कारकिर्दीत मंजूर व्हावा यासाठी मंत्रालय स्तरावर वेळोवेळी प्रयत्न केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास आराखड्यात दोडामार्ग नगरपंचायत अग्रेसर आहे. दोडामार्ग नगरपंचायत गोव्याच्या बाजूला आहे. मोपा एअरपोर्ट जवळ आहे व बाजूलाच गोवा-उसप या भागात एमआयडीसी होणार आहे. त्यामुळे हा आराखडा लवकर होणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्या जमिनीमध्ये जायला रस्ते नाहीत ते रस्ते आरक्षित केलेले आहेत. जर या आराखड्यामुळे खरोखरच कोणावर अन्याय होत असेल तर कमिटी बसून त्याला न्याय कसा मिळेल या दृष्टीने काम करणार आहोत. यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

चेतन चव्हाण, नगराध्यक्ष-दोडामार्ग न. पं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news