

दोडामार्ग : भाजपाने त्यांच्या मित्र पक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेला धक्का देत ग्रामपंचायत स्तरावर मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. साटेली-भेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांनी शिंदे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत भाजपाचे कमळ स्वीकारले आहे. त्यांच्या सोबत काही ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनीही भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर महायुतीच्या एकजुटीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी थेट प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबतचा अहवाल सादर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
साटेली-भेडशी येथे राजकीय भूकंप घडवत भाजपने मित्रपक्ष शिंदे शिवसेनेच्या गोटात थेट शिरकाव करत उपसरपंचासह अनेकांना आपल्या पक्षात दाखल करून घेतले. या प्रकारामुळे महायुतीत याआधीच सुरू असलेला संघर्ष आता पुन्हा उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी शिंदे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांविरोधात गंभीर तक्रार थेट वरिष्ठ नेत्यांकडे दिली होती. यावरून दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या. त्यानंतर एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याचे खुले आव्हान दिले जाऊ लागले. अगदी आगामी निवडणुका स्वबळावर लढू अशी तयारीसुद्धा दोन्ही बाजूंनी सुरू झाल्याने महायुतीतील ऐक्य धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली होती.
या तणावाच्या पार्श्वभूमीवरच साटेली-भेडशी येथे शिंदे गटाच्या उपसरपंच सुमन डिंगणेकर यांनी थेट भाजपात प्रवेश करून कमळ हाती घेतले. डिंगणेकर यांच्यासोबत इतर काही ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांनीही भाजपात जाहीर प्रवेश करून शिवसेनेला जबर धक्का दिला. मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. शिंदे शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी या घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपवर थेट महायुतीचे धोरण मोडल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
महायुतीमध्ये असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा एकमेकांच्या पक्षांमध्ये प्रवेश घेऊ नये व प्रवेश घेऊन महायुतीला तडा देऊ नये असे तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश आहेत. असे असताना सावंतवाडी मतदारसंघांमध्ये आमच्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांचा भाजपा पक्षांमध्ये प्रवेश होत आहे, याची दखल पालकमंत्री नीतेश राणे यांनी घ्यावी. शिवाय याबाबतचा अहवाल जिल्हाप्रमुख यांसह पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात येईल.
गणेशप्रसाद गवस शिंदे शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख