

दोडामार्ग ः नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा हा पूर्वीच करण्यात आला होता. त्यावेळी मी नगराध्यक्ष नव्हतो. याबाबत मी सर्व काही नंतर स्पष्ट करेन. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा आराखडा मंजूर होतो व तो रद्द होऊ शकत नाही. त्यामुळे या आराखड्याबाबत नागरिकांनी तक्रारी त्यांच्या हरकती द्याव्यात. जेणेकरून याबाबत शासनाशी भांडता येईल, असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नगरपंचायत प्रारूप विकास आराखड्याबाबत गुरुवारी नगरपंचायत कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर नगराध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काही विरोधक नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. प्रारूप आराखड्यानंतर नागरिकांना घर बांधता येणार नाही, तसेच इतर मूलभूत समस्या निर्माण होतील, असे गैरसमज निर्माण केले होते. मात्र, बैठकीत ते दूर झाले आहेत. हा प्रारूप आराखडा 25 ते 30 वर्षांचा आहे. शिवाय सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तो रद्द करता येत नाही असे नगराध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केले.
या प्रारूप आराखड्याबाबत अलीकडेच एक बैठक झाली होती. तेव्हा अधिकार्यांनी पत्रकारांना अटकाव केला होता. या बैठकीत आराखडा तयार करून आता त्यांच्या हरकती मागितल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या हरकती द्याव्यात. त्या ऐकून घेऊन त्यांना न्याय देणार असल्याचे नगराध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केले. उपस्थित नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
प्रारूप आराखड्याबाबत उपस्थित अधिकार्यांनी अभिप्राय दिल्यानंतर तो मंजूर होणार असे सांगितले. त्यावर विरोधक कोण? या प्रश्नाला उत्तर देताना नगराध्यक्ष चव्हाण म्हणाले, त्याचे नाव आम्ही सांगण्यापेक्षा पत्रकारांना तो माहिती आहे. विरोधकाचे नाव घेऊन मी त्याला मोठं करणार नाही, मात्र त्या विरोधकाने हाच दृष्टिकोन ठेवला तर त्याला पुढील निवडणूक लढवता येणार नसल्याचा दावा नगराध्यक्ष चव्हाण यांनी केला.