

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शेतकर्यांची शेती एका बाजूने हत्ती उध्वस्त करत आहे. तर दुसर्या बाजूने माकडे व रानडुकर शेतीची नासधूस करत आहे. त्यामुळे या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तालुक्यातील स्थानिक तरुणांनी शेतीकडे वळून आधुनिक कृषी संकल्पनांचा स्वीकार करत चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न पाहिले होते. घोटगेवाडी, घोटगे, परमे, साटेली, कुडासे, सासोली, आंबेली, कसई, मणेरी या गावांमध्ये शेती, फळ बागायती फुलवल्या. मात्र या बागायतींवर हत्ती संकट गडद होऊ लागले असे असतानाही शेतकर्यांनी न डगमगता पुन्हा जोमाने शेती फुलवल्या. मात्र अलीकडच्या काही वर्षांत लाल तोंडाच्या माकडांचे प्रमाण इतके वाढले आहे की, शेतकर्यांच्या बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू लागले आहेत.
एखादा दिवस नसतो की, माकडांच्या टोळ्यांनी एखाद्या शेताचे नुकसान केले नसावे. हे माकड इतकी प्रचंड नुकसान करत आहेत की, झाडांवर फळे येण्याआधीच ती फोडून टाकली जात आहेत. परिणामी, बाजारात नारळ व केळी मिळणे कठीण झाले आहे.
माकडांनंतर आणखी एक संकट म्हणजे रानडुकरे. यांची संख्या इतकी वाढली आहे की, आता हे केवळ फळे खाण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर नारळाची झाडेसुद्धा मुळासकट उखडून टाकत आहेत.
रात्रीच्या अंधारात हे डुकरे टोळ्यांमध्ये येतात आणि संपूर्ण बाग उद्ध्वस्त करून टाकतात. लाखोंचा खर्च करून उभ्या केलेल्या बागा एका रात्रीत जमीनदोस्त होत आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे हत्तींचा उपद्रव सुरूच आहे आणि दुसरीकडे हे माकड, डुकरे, इतर प्राणी नुकसान करत आहे. त्यामुळे वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.