

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात जि. प. शाळांची दिवसेंदिवस कमी होणारी पटसंख्या चिंतेची बाब बनली आहे. याकडे येणार्या काळात आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत शाळेत एकच विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा चार आहेत, तर गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी नसल्याने एक शाळा बंद झाली होती. यावर्षी मात्र एकही शाळा बंद झाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
तालुक्यात एकूण जिल्हा परिषदच्या 92 शाळा आहेत. यात एक विद्यार्थी पटसंख्या असलेल्या चार, दोन पटसंख्येच्या पाच, तीनच्या चार, चारच्या पाच, पाच पटसंख्येच्या दोन, दहा पटसंख्येच्या 19 अशाप्रमाणे शाळेत विद्यार्थी आहेत. दिवसेंदिवस या शाळांची पटसंख्या कमी का होते याची अनेक कारणे आहेत. रोजगारासाठी गावातून अनेकांनी स्थलांतर केले आहे. त्यातच अलीकडे एक फॅड आले आहे ते म्हणजे माझे मुल इंग्रजी शाळेत शिकले पाहिजे. परिणामी अनेक पालक त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यम शाळेत पाठवितात. त्यामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेत मुलांची पटसंख्या कमी होत चालली आहे. याला आपणच कारणीभूत आहोत. जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण असताना पालकांचा आग्रह खासगी संस्था असलेल्या इंग्रजी शाळात अलीकडे दिसून येतो.
यावर जेव्हा विचार मंथन केले पाहिजे, तेव्हाच कुठेतरी जिल्हा परिषद शाळा टिकतील. आजवर कित्येक जण जिल्हा परिषद शाळा शिकून उच्च पदावर आहेत. प्रशासकीय सेवेत आहेत, याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक खूपच तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. विद्यार्थी, पालक यांचा कल या शाळांकडे वाढविला पाहिजे, म्हणून अनेक उपक्रम राबवीत असतात. पालकांचा सहभाग देखील अशा उपक्रमात वेळोवेळी दिसून येतो.
गावातील शाळा टिकण्यासाठी प्रत्येक गावातून उठाव झाला पाहिजे आणि मराठी भाषेविषयी आपण सर्वजण पेटून उठलो तर ज्या प्राथमिक शाळातून मराठीचे धडे घेतले जातात त्या सुद्धा भविष्यात टिकण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न नको का व्हायलात? मात्र ते होताना दिसत नाहीत. मराठी शाळेचे भवितव्य विद्यार्थीविना संकटात सापडले आहेत. त्यामुळे यावर सर्वांनी एकत्र येत विचार केला पाहिजे.
स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगाराभिमुख उद्योग आणले पाहिजे ... काही पालक त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमच शिक्षणासाठी पाठवत आहेत. यामुळे पटसंख्या कमी होत आहेत.हे कारण असले तरी अनेक जण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी गाव सोडून बाहेरगावी जात आहे. दोडामार्ग तालुक्याला लागूनच अगदी गोवा राज्य असून त्या ठिकाणी तालुक्यातून अनेक जण रोजगारासाठी गेले आहेत. यावेळी सोबत आपले कुटुंबही न्यावे लागते. गावातील विद्यार्थी कमी होण्याचे हे देखील मुख्य कारण आहे. त्यामुळे स्थलांतर रोखण्यासाठी येथील राजकीय व्यक्तींनी रोजगाराभिमुख उद्योग आणले पाहिजे तरच खर्या अर्थाने स्थलांतर थांबेल.