Sindhudurg Devgad trawler seized | देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त

देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त
Sindhudurg Devgad trawler seized
Sindhudurg Devgad trawler seized Pudhari photo
Published on: 
Updated on: 

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा ट्रॉलिंग करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने आणखी एक कठोर आणि धाडसी कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदराची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ (SHRI ANAGHA) देवगडसमोरील समुद्रात पकडून जप्त करण्यात आली. ही कारवाई देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली. मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘नो टॉलरन्स’ धोरणाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या अंधारात ही कारवाई पार पडली.

Sindhudurg Devgad trawler seized
Mumbai Sindhudurg Flight : आजपासून नवी मुंबईहून सिंधुदुर्ग विमानसेवा

मध्यरात्रीचा रोमांचकारी पाठलाग

२३ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १२.२५ वाजता सुनियोजित गस्तीदरम्यान देवगडसमोर सुमारे ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर ‘श्री अनघा’ वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. गस्ती नौका ‘शीतल’ दिसताच सदर ट्रॉलरने ताबडतोब वेग वाढवला आणि अंधारात पळ काढला. मागावरून सुटण्यासाठी नौकेवरील दोरखंड आणि जाळे गस्ती नौकेकडे फेकण्यात आले. यामुळे गस्ती नौकेच्या प्रोपेलरमध्ये जाळे अडकण्याची भीती निर्माण झाली. एका चुकीच्या निर्णयामुळे गस्ती नौकाच अपघाताग्रस्त होण्याची शक्यता होती. मात्र किरण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी सुरक्षा रक्षक यांनी संयम सोडला नाही.

अंधारात, भर समुद्रात आणि अधिक वेगवान हायस्पीड ट्रॉलरच्या पाठलागातही त्यांनी योग्य तंत्रकौशल्य वापरत सातत्याने पाठपुरावा केला. तासाभराच्या थरारक पाठलागानंतर शेवटी ‘श्री अनघा’ देवगडसमोरील समुद्रात ताब्यात घेण्यात आली.

Sindhudurg Devgad trawler seized
Sindhudurg News| सिंधुदुर्ग स्टेशनवरील वातानुकूलित कक्षाचे उद्‌घाटन

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ आणि सुधारित अधिनियम, २०२१ अंतर्गत नौका जप्त करण्यात आली. नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कार्यवाही सुरू होती. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

जप्त नौकेची माहिती

• नौकेचे नाव: श्री अनघा (SHRI ANAGHA)

• नोंदणी क्रमांक: IND-KA-02-MM-5927

• मालक: मिथुन सुवर्णा

• पत्ता: कालमाडी बोट्टला, मल्पी, कोडावूर, उडपी

मलप्पे बंदरातील या नौका अधिक अश्वशक्ती क्षमतेच्या असल्याचे समजते. मालवण आणि देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी हायस्पीड ट्रॉलरमुळे त्यांच्या जाळ्या तोडल्या जात असल्याची वारंवार तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर विभागाने महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात मासेमारी करणाऱ्या अशा नौकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे.

कार्यवाही करणारे पथक

ही संपूर्ण कारवाई देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे पार पाडली. सागरी सुरक्षा रक्षक संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर, योगेश फाटक, अमित बांधकर आणि स्वप्नील सावजी यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. कारवाई सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

कारवाईनंतर किरण वाघमारे म्हणाले, “स्थानिक मच्छिमारांच्या हिताचे रक्षण आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. बेकायदा मासेमारी करणाऱ्या कोणत्याही नौकेला आम्ही सोडणार नाही. रात्रीच्या अंधारातही आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले. मंत्री नितेश राणे यांच्या कडक धोरणाची अंमलबजावणी आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. स्थानिक मच्छिमार आता निर्धास्तपणे मासेमारी करू शकतील.”

स्थानिक मच्छिमारांचे समाधान

रात्रीच्या अंधारात भर समुद्रात अधिक वेगवान नौकेचा पाठलाग करून तिला पकडणे हे सोपे काम नव्हते. सुयोग्य नियोजन, तंत्रकौशल्य आणि कर्तव्यनिष्ठेमुळे ही कारवाई यशस्वी झाली. यामुळे स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक हित सुरक्षित राहत असून सागरी जैवविविधतेचेही प्रभावी संरक्षण होत आहे. बेकायदा मासेमारीविरुद्ध ‘नो टॉलरन्स’ धोरण कायम राहील, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.