

मुंब्रा : गेली दोन वर्षे बंद असलेली मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा उद्या १६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा प्रवास एक तास दहा मिनिटे म्हणजेच ७० मिनिटांचा असणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी अशी दिवसातून दोन वेळा ही सेवा उपलब्ध आहे.
या विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्व तिकिटे विकली गेल्याचे 'फ्लाय ९१'च्या संकेतस्थळावर दिसत आहे. नवी मुंबईहून सकाळी उड्डाण या मार्गावरील विमानांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्ग हे विमान सकाळी ७.५५ वाजता उड्डाण घेईल, तर सकाळी ९.५ वाजता चिपी येथे पोहोचेल.
सिंधुदुर्ग ते नवी मुंबई हे विमान सकाळी ९.२५ वाजता निघून सकाळी साडेदहाच्या सुमारास नवी मुंबईत पोहोचेल. दोन्ही दिशांचा नियोजित प्रवास सुमारे एक तास १० मिनिटांचा आहे. सध्या या मार्गावर दररोज एक फेरी असेल. त्यामुळे त्याच दिवशी मुंबईतून सिंधुदुर्गला जाऊन संध्याकाळी विमानाने परत येण्याची सुविधा या वेळापत्रकात नाही.
सिंधुदुर्ग आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांना रस्ते वाहतुकीसह हवाई प्रवासाचा पर्याय मिळणार असल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले. चिपी विमानतळ आता पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू होत आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी थेट विमानसेवा आठवड्याच्या सातही दिवस सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
राणे म्हणाले की, १९९९ मध्ये खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 'पर्यटन जिल्हा' घोषित केले होते. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे आणि आर्थिक समृद्धी यावी या उद्देशाने चिपी येथे हक्काच्या विमानतळाचे भूमीपूजन करण्यात आले होते. मध्ये काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा खंडित झाली होती.
पर्यटन आणि रोजगाराला मिळणार मोठी गती
विमानसेवा पूर्ववत झाल्याने आणि वेळागर तसेच देवगड येथे 'ताज' सारखे मोठे प्रकल्प येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. या विमानसेवेमुळे टूर गाईडपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील आणि स्थानिक तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. १६ नोव्हेंबरपासून केवळ विमानाचे उड्डाण होणार नसून, खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठा 'टेक ऑफ' मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त करत कोकणातील नागरिक आणि तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे.