

ओरोस : प्रवाशांच्या सेवेसाठी सिंधुदुर्ग स्टेशनवर वातानुकूलित बैठक व्यवस्था सुरू केली असून सिंधुदुर्ग स्टेशनच्या अन्य समस्या, प्रश्न सोडवून रेल्वे प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही आ. नीलेश राणे यांनी दिली
कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग स्टेशनवर नव्याने वातानुकूलित रूम बैठक व्यवस्थेचा शुभारंभ आ.राणे यांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कोकण रेल्वे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र बापट, सचिन देसाई, जि. प. सदस्य सुप्रिया वालावलकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर, ओरोस सरपंच पांडू मालणकर, खजिनदार स्वप्निल गावडे, साई आंबेरकर, सिंधुदुर्ग स्टेशन अध्यक्ष आप्पा मांजरेकर, वरिष्ठ पर्यवेक्षक मधुकर मातोंडकर, उपअभियंता श्री.किल्लेदार, शिवसेना शाखाप्रमुख मदन परब, रेल्वे कर्मचारी श्रुती निपाणीकर, प्रणाली अवसरे, स्टेशन मास्तर गिरीश सामंत आदीसह रेल्वे संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी उपस्थित होते
कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र बापट यांनी आ. नीलेश राणे यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन, श्रीफळ आणि फीत कापून या वातानुकूलित कक्षाचे उद्घाटन आ. राणे यांच्या हस्ते करण्यात आले
आ.नीलेश राणे म्हणाले, कोकण रेल्वे प्रवाशांच्या आणि जिल्हा मुख्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या दृष्टीने सिंधुदुर्ग हे महत्त्वाचे स्टेशन असून या स्टेशनच्या सोयीसुविधा, समस्या सोडविण्यासाठी आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पाठपुरावा केला जात आहे. त्यातूनच या वातानुकूलित कक्षाचे उद्घाटन होत आहे. नजीकच्या काळात या स्टेशनवर अन्य सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी आपण रेल्वे प्रशासन आणि रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू. कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनात सिंधुदुर्ग स्टेशनवर जनशताब्दी, नेत्रावती या दोन गाड्यांना थांबा मिळावा, सिंधुदुर्ग स्टेशनचे अणाव अप्रोच रोड तसेच सिंधुदुर्ग स्टेशनच्या सुशोभिकरणाच्या कालावधीत मंजूर भव्य गेट स्टेशन फूटपाथवर पत्र्यांची शेड यास अनेक समस्या प्रलंबीत आहेत. या निवेदनाचाही योग्य तो विचार करून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही आ. राणे यांनी दिली.