Devgad Fertilizer Shortage | देवगड तालुक्यात खतांचा तुटवडा!
देवगड : देवगड तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकर्यांना शेतीसाठी उपयुक्त खतांचे वाटप करण्यात आले. मात्र काही शेतकर्यांना द्यावीत, अन्यथा, ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याबाबतचे निवेदन पदाधिकार्यांनी देवगड तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे दिले.
ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी तहसीलदार आर. जे. पवार यांची भेट घेत खतांच्या तुटवड्याबाबत लक्ष वेधले व निवेदन दिले. यावेळी शेतकर्यांना उपयुक्त असलेल्या खतांचे वाटप करण्यात आले. खताच्या तुटवड्यामुळे बहुतांशी शेतकर्यांना खते मिळाली नाहीत, त्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत.
खाजगी विक्रेते अधिक दराने खतांची विक्री करीत असून यामुळे शेतकर्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. युरिया, सुफला, संपूर्ण रविराज, अॅग्रो डीएपी, कृषी उद्योग, सिंगल सुपर फॉस्फेट आदी खतांचा तुटवडा भासत आहे.ही सर्व खते देवगड तालुक्यातील शेतकर्यांसाठी आवश्यक असून या खतांच्या तुटवड्यामुळे भात लावणीची कामे रखडली आहेत. याकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले.
यावेळी तालुका कृषी अधिकार्यांना तहसील कार्यालयात चर्चा करण्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र, कृषी विभागाच्या प्रतिनिधींना याबाबत योग्य माहिती देता आली नाही, याबाबत पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी मात्र रजेवर आहेत, त्यांचा प्रतिनिधींनाही योग्य माहिती देता येत नाही. याबाबत सुशांत नाईक यांनी तहसीलदार आर. जे. पवार यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या खतांचा तुटवडा भासत असल्याने खासगी विक्रेते फोफावले आहेत. ते वाढीव दराने खत विक्री करीत आहेत.
याकडे कृषी विभागाने लक्ष ठेवून असे प्रकार घडत असल्यास कारवाई करावी, अशी मागणी केली. आवश्यक खतांचा साठा त्वरित उपलब्ध करावा अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, जयेश नर, महिला संघटक हर्षा ठाकूर, उपतालुकाप्रमुख दादा सावंत, माजी सभापती रेश्मा सावंत, माजी उपसभापती संजय देवरुखकर, विभागप्रमुख विकास कोयंडे, महेंद्र भुजबळ, नगरसेवक तेजस मामघाडी, नितीन बांदेकर, गणेश कांबळी, गौरव सावंत, लक्ष्मण तारी, योगेश गोळम, मंगेश फाटक, बाळा कणेरकर, काका जेठे, दिनेश नारकर, सुनील तेली, शिवदास नरे, सचिन खडपे, विष्णू घाडी, राजीव वाळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाणीपुरवठा समस्येकडे लक्ष द्या...
देवगड जामसंडेचा पाणीप्रश्न ऐन पावसाळ्यात गंभीर झाला असून नागरिकांना सहा-सहा दिवस पाणी येत नाही आहे. दहिबांव येथे विजेची समस्या गंभीर असून यामुळे पंपींग होत नसल्याने पाणीपुरवठा होत नाही आहे, याकडे लक्ष द्यावे व पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.

