

देवगड : देवगड तालुक्यात सलग चार दिवस पावसाने धुमाकूळ घातला असून मुसळधार पावसामुळे हुर्शी-गडदेवाडी येथे जनावरांचा गोठा कोसळून सुमारे 40 हजार रुपयाचे नुकसान झाले. तर तालुक्यातील बरेच ठिकाणी प्रलंबित कामे पूर्णत्वास न गेल्याने पर्यायी रस्ते, मार्ग पावसामुळे वाहून गेले आहेत. तालुक्यात शनिवारी 102 मिमी. पावसाची नोंद आहे.
या पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मच्छीमार बांधवानी आपले व्यवसाय बंद करून नौका किनार्यावर घेण्यास सुरुवात केली आहे. हुर्शी-गडदेवाडी येथील सहदेव बाबाजी देवळेकर यांच्या घराशेजारी असलेला जनावरांच्या गोठा अतिवृष्टीमुळे कोसळून सुमारे 40 हजार रुपये नुकसान झाले.
तालुक्यात अनेक ठिकाणी विकासकामे, रस्त्यांची कामे सुरू आहेत, परंतु ती पूर्णत्वास न गेल्याने संबंधित जोडणार्या गावांचा काहीसा संपर्क तुटला होता. यामध्ये दहिबाव नारिंग्रे, खुडी कोटकामते, रहाटेश्वर वानिवडे आदी गावांचा सहभाग आहे. पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. मात्र सततच्या विजेच्या लंपडावामुळे नळयोजनाचा पाणीपुरवठा बंद असून देवगड-जामसंडे शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील जनतेची पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे.