

देवगड : देवगड विजयदूर्ग मार्गावर जामसंडे आझादनगर येथील धोकादायक वळणावर शैक्षणिक सहलीची आरामबस आणि कार यांच्यात समोरसमोर धडक बसली. या झालेल्या अपघातात कारमधील एकजण जखमी झाला असून त्याचा उजव्या डोळ्याकडील वरच्या बाजुला गंभीर दुखापत झाली आहे.हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ५.३० वा.सुमारास घडला.
याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनूसार, सांगली तासगाव येथील वसंतदादा पाटील ज्युनिअर कॉलेजची शैक्षणिक सहल शुक्रवारी सकाळी खाजगी आरामबसने सिंधुदूर्गमध्ये आली होती. या आरामबसध्ये शिक्षक व ४५ विद्यार्थी होते. शुक्रवारी सकाळी मालवण येथे सिंधुदूर्ग किल्ला पाहून दुपारी देवगडमध्ये कुणकेश्वर दर्शन घेवून सायंकाळी विजयदूर्ग किल्ला पाहण्यासाठी जात होते.
असताना ५.३० वा.सुमारास विजयदूर्ग मार्गावर जामसंडे आझादनगर येथील धोकादायक वळणावर विजयदूर्ग येथून देवगड येथे येणारऱ्या आयटेन कारची (एम्एच् १० - बीएम् ७११०) व आरामबसची (एम्एच् १०- अेडब्लयू ५४५४) समोरून चालकाचा बाजूने जोरदार धडक बसली. धडकेने कार आपटून मागे गेली.
या अपघातात कारचा दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तर कारचालक युवराज अडसुळे यांच्या बाजुला बसलेले सागर भाऊ वठारकर(५०) रा.कोल्हापूर यांच्या उजव्या डोळ्याचा वरच्या बाजुला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तात्काळ देवगड ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. अपघाताची माहिती समजताच आझादनगर मधील स्थानिक ग्रामस्थ, तसेच जामसंडे परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली.
देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार प्रविण सावंत, प्रसाद आचरेकर यांनीही घटनास्थळी जावुन स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने मदतकार्य राबविले. अपघातग्रस्त वाहने बाजुला घेण्यासाठी संजय शेडगे व ग्रामस्थ यांनी मदत केली. वाहतूक खोळंबून राहू नये यासाठी दोन्ही वाहने रस्त्याचा बाजुला घेण्यासाठी पोलिस व उपस्थित ग्रामस्थ यांनी तात्काळ मदतकार्य केले. आरामबसमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. विद्यार्थ्यांसमवेत चार शिक्षक होते. तर कारमधील तिघेही हे कोल्हापूर येथील असून व्यावसायिक कामानिमित्त ते देवगड मध्ये आले होते.विजयदूर्ग भागातील काम आटोपून ते सायंकाळी देवगडमध्ये येत होते. देवगड पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.