

देवगड ः जगप्रसिद्ध ‘देवगड हापूस’ यंदा ऑक्टोबर महिन्यातच वाशी (नवी मुंबई) एपीएमसी फळ बाजारात दिवाळी दिवशी दाखल झाला. देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांची पहिली पेटी दिवाळीच्या मुहूर्तावरच वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात आली होती. हा आंबा पिकल्यानंतर 6 डझन आंब्याच्या पेटीला विक्रमी 25 हजार रुपये दर मिळाला आहे. वाशी मार्केटमध्ये आजवर ‘हापूस’ पेटीला मिळालेला हा सर्वाधिक दर मिळाल्याची माहिती येथील व्यापार्यांनी दिली आहे.
वाशीतील एपीएमसी फळ बाजारात दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मुहूर्ताचा हापूस दाखल होतो. यंदा ऑक्टोबर महिन्यातच दिवाळी दिवशी पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश शिर्सेकर यांनी 6 डझन हापूस आंब्याची पेटी मार्केटमध्ये पाठविली होती. वाशी येथील नानाभाऊ जेजूरकर अँड कंपनी यांच्याकडे आलेल्या या आंबा पेटीची लक्ष्मीपूजन दिवशी पूजा करण्यात आली. दिवाळीत आंबा पेटी दाखल होण्याची पहिलीच वेळ असल्याचे येथील व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
दरम्यान आंबा कच्चा असल्याने पूजा करून तो पिकविण्यास ठेवला होता. आंबा पिकल्यानंतरच त्याची बोली लावली जाणार होती. त्यानूसार या आंब्याची बोली लागल्यानंतर 6 डझन आंब्याचा पेटीला विक्रमी 25 हजार रू. दर भेटला आहे, अशी माहिती व्यापारी हर्षल जेजुरकर यांनी दिली. एपीएम्सी मार्केटमध्ये कोकणातील मुहूर्ताचा हापूस आंब्याला आतापर्यंत सर्वांधिक 22 हजार दर मिळाला होता. यावर्षी मात्र देवगडमधील आंब्याने या सार्या दरांना मागे टाकत विक्री असा 25 हजाराचा दर मिळविला आहे.