

कणकवली : मालवणमध्ये आ. नीलेश राणे यांनी पैसे वाटपाचा प्रकार उघडकीस आणला. कणकवलीतही तोच प्रकार सुरू आहे. येथील गतवेळच्या सत्ताधार्यांनी दहा वर्षात खरोखरच विकास केला असेल, तर त्यांच्यावर पैसे वाटण्याची वेळ का आली? असा सवाल करत अनेक लोक विरोधकांच्या भीतीपोटी पैसे स्विकारत आहेत, मात्र विरोधकांनी कितीही पैसे वाटण्याचा प्रयत्न केला तरी धनशक्तीचा पराभव होईल असा विश्वास माजी आ. राजन तेली व ठाकरे शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
राजन तेली म्हणाले, विरोधकांवर पैसे वाटण्याची वेळ आली याचाच अर्थ त्यांचे काम मतदारांच्या पसंतीस उतरलेले नाही. पराभव समोर दिसू लागल्यानेच पैसे वाटपाचे प्रकार सुरू झाले आहेत. मालवणमध्ये पैसे वाटपाचा प्रकार आ. निलेश राणे यांनी हाणून पाडला, त्यावेळी त्यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला गेला पण निलेश राणे डगमगले नाहीत.
वास्तविक भाजपमधील अनेकांशी आमचे चांगले संबंध आहेत पण पैसे वाटपाचा प्रकार काहीजणच करत आहेत. विजय केनवडेकर हे संघाचे कार्यकर्ते आहेत पण संघाने अशी संस्कृती शिकवलेली नाही. विजय केनवडेकर हे विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्यासाठीही पैसे वाटप करत होते, या माजी आ.वैभव नाईक यांनी केलेल्या विधानाविषयी विचारले असता तेली म्हणाले, वैभव नाईक यांची माहिती चुकीची आहे.
कारण निलेश राणे यांचे काम दत्ता सामंत व बाकीचे मंडळी करत होती, असेही तेली म्हणाले. धनशक्तीचा पराभव निश्चित आहे आणि मतदार शहर विकास आघाडीला पाठिंबा देतील असा विश्वासही तेली यांनी व्यक्त केला.