

ओरोस : सिंधुदुर्गातील तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत यांची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतर आता या 4 ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. या 4 नगराध्यक्षपदांसाठी 18, तर 77 सदस्यपदांसाठी 266 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. शुक्रवारपर्यंत नगरसेवकपदांसाठी दाखल 300 अर्जांपैकी फक्त 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
तर थेट नगराध्यक्षपदासाठी दाखल 19 पैकी केवळ कणकवलीत एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने 18 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दरम्यान जिल्ह्यात महायुती तसेच महाविकास आघाडीतही बिघाडी झाली असून, सावंतवाडी, मालवण व वेंगुर्ले नगरपरिषदांमध्ये चौरंगी वा बहुरंगी लढती होणार आहेत. तर कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजप विरोधात सर्वपक्षीयांची शहर विकास आघाडी, अशी लढत होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद तीन आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी न झाल्याने महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप-शिंदे शिवसेना, तर महाविकास आघाडीच्या ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस,राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी 5 अर्ज तर, 17 सदस्यपदासाठी 49 अर्ज दाखल होते. त्यात शुक्रवारी नगराध्यक्ष पदाचा 1 अर्ज मागे घेण्यात आला.
नगरसेवकपदासाठी 13 अर्ज मागे घेण्यात आले. यामुळे कणकवलीत आता नगराध्यक्षपदासाठी 3 तर 17 नगरसेवकपदाांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत.या ठिकाणी शहर विकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होत आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी 6 तर 20 नगरसेवकपदांसाठी 86 उमेदवार रिंगणात आहेत. येथे प्रामुख्याने तिरंगी, चौरंगी लढती होणार आहेत.
मालवण नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवकपासाठी 61 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा आणि शिंदे शिवसेनेने ही नगरपरिषद प्रतिष्ठेची केली आहे. वेंगुर्ले नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार तर, 20 नगरसेवकपदांसाठी 83 उमेदवार रिंगणात असून या ठिकाणी सर्वच ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत.
सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून निवडणुका प्रतिष्ठेच्या या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ही निवडणूक असून, पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे राज्य प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, तर शिंदे शिवसेनेच्या वतीने कुडाळ-मालवणचे
आ. नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सावंतवाडी मतदारसंघाचे आ. दीपक केसरकर, महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे माजी आ. वैभव नाईक या प्रमुख नेत्यांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. कणकवली नगरपंचायतीमध्ये ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर, तर मावळते नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यातच थेट लढत होणार आहे. यामुळे 2 डिसेंबर रोजी होणार्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे तीन डिसेंबरच्या निवडणूक मतमोजणी निकालावर स्पष्ट होणार आहे .