

सिंधुदुर्गात निवडणुकीचं वातावरण तापलं असून शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपच्या उमेदवारावर गंभीर आरोप केला आहे. मतदारांना पैसे वाटप केलं जात असल्याचा आरोप पारकर यांनी केला.
"विकासाच्या नावावर निवडणूक लढवणाऱ्यांनी जनतेचे लुटलेले पैसे पुन्हा वाटण्याची वेळ कशी आली? प्रत्येक मतदाराला 10 ते 15 हजार रुपये का देावे लागत आहेत?" असा सवाल पारकर यांनी उपस्थित केला. पराभव नजरेसमोर दिसू लागल्यामुळे पैशांचा वापर सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला. "हे शहर पैशाने विकलं जाणार नाही," असा विश्वास पारकर यांनी व्यक्त केला.
पारकर म्हणाले की, शहर विकास आघाडी ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर नसून सर्व राजकीय पक्षांना आव्हान देऊन 'शहरासाठी एकत्र' या संकल्पनेतून ही आघाडी उभी केली आहे. या आघाडीला ‘नारळ’ हे चिन्ह मिळाले असून कोणताही उमेदवार पक्षाच्या अधिकृत चिन्हावर उभा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.