

मंडणगड : मंडणगड येथे झालेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील राहू. जेणेकरून बाबासाहेबांचे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, असे प्रतिपादन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते रविवारी झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती माधव जामदार, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. पी. तावडे, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) अमृता जोशी, बार असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सावंत, सदस्य संग्राम देसाई, वकील संघाचे अध्यक्ष मिलींद लोखंडे, आमदार किरण सामंत, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आदी उपस्थित होते.
यावेळी सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते कळ दाबून न्यायालय इमारत प्रांगणातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच म्युरलचे अनावरण करण्यात आले. यानंतर नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी न्यायदान कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश श्रीमती जोशी यांना आसनावर विराजमान करण्यात आले. येथील ग्रंथालयाचेही उद्घाटन आणि पहाणी सरन्यायाधीशांनी केली.
सरन्यायाधीश गवई पुढे म्हणाले की, लोकशाहीने सर्वसामान्यांना बहाल केलेल्या न्याय, शासन व प्रशासन या व्यवस्थांनी समन्वयाने काम केल्यास उत्तम काम उभे राहते, बाबासाहेबांनी देशास दिलेल्या संविधानामुळे आज देश विकासाच्या मार्गावर कार्यरत असून, शेजारील राष्ट्रांशी तुलना करता स्थिरपणे विकसित राष्ट्राकडे प्रगती करीत आहे. आजचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. न्यायमूर्ती म्हणून मला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर खंडपीठ आणि आजच्या मंडणगड न्यायालय इमारतीचे लोकार्पण हे दोन्ही कार्यक्रम या माझ्या 22 वर्षातील महत्त्वाचे आहेत. अतिशय कमी वेळेत मंडणगड येथे न्यायालय सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याच्या भूमिपुजनाला आम्ही दोघे उपस्थित होतो आणि आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही आम्ही दोघे उपस्थित आहोत, हा गौरवाचा क्षण आहे. अवघ्या 20 दिवसात कोल्हापूर येथील जुन्या इमारतीचा कायापालट करुन खंडपीठ सुरु केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वंचिताना न्याय देण्यासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्य वेचले, त्यांचा पूर्णाकृती पुतळा या न्यायालयात आहे. न्यायाचे व घटनेचे हे मंदिर आहे. याची जाणीव हा पुतळा करुन देईल. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती श्री. कर्णिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.