

मंडणगड : मंडणगड एसटी बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी निचरा करण्यासंदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना एसटी प्रशासनास अनेक वर्षे साधता आली नाही. एसटी स्टँड स्वच्छतागृह परिसरात साचलेले दुर्गंधीचे सांडपाणी व अस्वच्छतेचा प्रवाश्यांसह स्थानकानजीक रहिवासी असलेल्या नागरिकांना होत आहे. स्वच्छतागृहाच्या प्रश्नाबाबत एसटी प्रशासन व नगरपंचायत या दोघांमध्ये अनेक वेळा बैठका झाल्या मात्र त्यावर आजपर्यंत मार्ग निघाला नाही
स्टँड परिसरातील अस्वच्छतेच्या प्रश्नाची बाब माध्यमे व सामाजिक संघटनांनी वारंवार संबंधित प्रशासनाच्या लक्षात आणून दिली, त्याबाबत निवेदने सादर करण्यात आली. शहरात अन्य ठिकाणी एकही स्वच्छता गृहाची निर्मिती नगरपंचायत स्थापनेपासून अद्यापही झाली नाही. त्यामळे शहरात एकमेव असलेल्या बस स्थानकातील स्वच्छतागृहाचा वापर येथील प्रवाशांबरोबर, व्यापारीवर्ग, तालुकाठिकाणी विविध कामांसाठी येणारे नागरिक करतात. येथील दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावर वाढलेले जंतू, डासांमुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहराची भौगोलिक स्थिती व वाढत्या शहरीकारणामुळे सांडपाणी वाहून नेण्याची गटार व्यवस्थेची निर्मिती करता आली नाही असे कारण स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र स्वच्छतागृहाच्या सांडपाण्याचा त्रास बसस्थानकाच्या नजीकच्या घरांनासुद्धा होत असल्याच्या तक्रारी आहेत. या घरांच्या बोअरवेलचे पाणी खराब होत असलेची गंभीर बाब या तक्रारींमध्ये नमूद करण्यात आली आहे.
शहरातील एकमेव असलेल्या स्वच्छतागृहाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी, नवीन स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यासाठी नगरपंचायतीने वारंवार पुढाकार घेतला. मात्र एसटी प्रशासनाने आपल्या अखत्यारीत असलेल्या जागेत काम करण्यासाठी नगरपंचायतीच्या प्रस्तावास अनुकुलता दाखवली नाही. यासंदर्भात एसटी प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांच्यामध्ये अनेक बैठकाही झाल्या. मात्र उपाययोजना झाल्याच नाहीत. त्यामुळे स्वच्छतागृहाचा प्रश्न आजपर्यंत अनुत्तरीत राहिला. असे असले तरी अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याचे काम एसटी प्रशासनाला जमलेले नाही व त्याचा नाहक त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.