

विनोद पवार
मंडणगड : तालुक्यातील किल्ले मंडणगड हा शहरानजीक असलेला ऐतिहासिक डोंगरी किल्ला. कोकणातील व्यापारी मार्गांच्या संरक्षणात महत्त्वाचा वारसा मानला गेला. शिवकालीन इतिहासाच्या सुमारे 300 वर्ष अगोदर म्हणजेच या किल्ल्यास बाराव्या शतकापासूनचे ऐतिहासिक संदर्भ लाभले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासाच्या पाऊलखुणा येथे असल्याचा इतिहास जाणकार सांगतात. ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या या किल्ल्यावर पर्यटनदृष्ट्या विकासाच्या वाटा प्रशस्त करता येऊ शकतात. यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
या किल्ल्यावर गणपती मंदिर, दोन तळी, तोफ, धान्याचे मोठे वखार हे अवशेष आहेत. याबरोबरच नष्ट झालेल्या अनेक महालांचे चौथरे ही आहेत.र्हीं महत्वाची वैशिट्ये पहायला मिळतात. म्हणजेच सुमारे बाराशे वर्षांपूर्वीचे जीवनमान व संस्कृतीचे येथील अवशेषांमुळे दर्शन होते व अनुमान लावता येते. त्यावेळी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांची वास्तू निर्मिती ही संरक्षणात्मक आणि स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने अत्यंत दूरदृष्टीपूर्ण होती. किल्ल्यावर बाराही महिने पाण्याचा साठा राहील असे दोन तलाव किल्ल्यावर बांधले गेले आहेत. अन्नधान्य साठवण्यासाठी बांधलेली मोठी धान्य कोठारे ही त्यावेळच्या बुद्धिमत्तेची साक्ष देतात.
किल्ले मंडणगड हा फारच जुना किल्ला असल्याने येथील अवशेष किल्ल्यावर वाहणार्या जोरदार वारा व वातावरणातील अन्य कारणांमुळे गाढले गेले असावेत असे अनुमान आहे. त्यामुळे येथील शत्रूवर नजर ठेवता येणारे बुरुज आणि तटबंदी सद्या अस्तित्वात नाही. किल्ल्यावर अनेक बाबी करण्याजोग्या आहेत.