

वेंगुर्ला: वेंगुर्ला शहराचा समतोल विकास साधायचा आहे व शहरात विविध विकासात्मक प्रकल्प आणावयाचे आहेत. नरेंद्र मोदी, श्री. फडणवीस यांच्या विचारधारा पुढे नेऊन आज डबल इंजिनप्रमाणे ट्रिपल इंजिन सरकार आणण्याची गरज आहे. यासाठी भाजपाला आशीर्वादरुपी आपले अमूल्य मत द्या, असे प्रतिपादन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथे केले. या नगरीच्या पुढील 5 वर्षे विकासासाठी मी मंत्री म्हणून कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने वेंगुर्ला भाजपा कार्यालय येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ना. नितेश राणे बोलत होते. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक महेश सारंग, तालुकाध्यक्ष पप्पू परब, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरप, वसंत तांडेल आदी उपस्थित होते. ना. राणे म्हणाले, मागील टर्ममध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व दिलीप गिरप टीमने नागरिकांच्या साथीने या नगरीचा भरीव विकास केला.
वेंगुर्ला शहराचे आणखी महत्वाचे प्रश्न आहेत, ते नागरिकांशी चर्चा करून सोडवायचे आहेत. मुख्यमंत्री आमच्या घरातील राहिले असून त्यांनी सिंधुदुर्गचा विकासरूपी कायापालट केला आहे. वेंगुर्लेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी शहरात भाजपची सत्ता ही नितांत गरज आहे. आज व्यापार्यामध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. याबाबत मी ठामपूर्वक सांगतो की, व्यापार्यांच्या 1 इंचही दुकान रुंदीकरण करू देणार नाही.
बाजारपेठेतील व्यापार्यांच्या विरोधात काहीच निर्णय घेतले जाणार नाहीत व घ्यायला दिले जाणार नाहीत. व्यापार्यांना विश्वासात घेऊनच चांगले निर्णय घेतले जातील, त्यामुळे रुंदीकरणाचा प्रश्न संपला आहे. नागरिकांना 8 ते 10 नागरी सुविधा उपलब्ध करून द्यावयाच्या असून लोकांना चांगली पार्किंग सुविधा उपलब्ध करून देऊ. मच्छीमार्केट भाग 2 करावयाचा असेल, तर मंत्री म्हणून मी तत्पर आहे.
आज वेंगुर्ला येथे ऐतिहासिक बंदर असून आज आपण त्या खात्याचा मंत्री आहे. येथील नागरिक, मच्छिमार बांधव यांना रोजगारयुक्त सुविधा, शहराच्या विकासाबरोबरच पर्यटन वाढविण्यासाठी मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. वेंगुर्ला शहराचा समतोल विकास साध्य करायचा असून बाजारपेठेभोवती नवीन छोटे मोठे प्रकल्प आणवयाचे आहेत. येथील सेंटलुक्स हॉस्पिटलच्या जागेवर प्रकल्प आणावयाचा आहे.
येथील उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयात चांगले डॉक्टर्स, आरोग्य सुविधा निश्चितच देण्यासाठी मी तत्पर आहे. प्रत्येक प्रभागात विकास पोहचविण्यासाठी, बचतगट विकास, उमेद सारखे मॉल वेंगुर्लेत उभे करण्याची जबाबदारी माझी आहे. जनतेने भाजपला मतदानरुपी आशीर्वाद दिल्यास पुढील 25 वर्षे शहर विकासाचे सुयोग्य नियोजन हे आमचे भाजपचे ध्येय आहे, तुम्ही साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
आज महाविकास आघाडी कुठे आहे, हे शोधावे लागतेय. प्रतिस्पर्धी उमेदवार निधी आणू शकतोय का? भाजपा महायुतीची सत्ता असल्याने वरिष्ठ स्तरापर्यंत पोहचू शकतो का? याचा विचार करा. गवळीवाड्याचा विषय कोणी सोडविला? आम्ही तो कॅबिनेट मध्ये मांडला व सोडविला. ताज प्रकल्प चा विषय आपण विशेष प्रयत्न करून मार्गी लावला. आज शिंदे सेनेच्या सचिन वालावलकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सांगावे.
जिल्ह्यामध्ये युती करू नका, असे सचिन वालावलकर यांनी सांगितले, असा टोला त्यांनी हाणला. भाजपा युतीधर्म निश्चितच पाळणार असून जनतेने आशीर्वाद दिला तर वेंगुर्ला शहराचा विकास करण्याची नैतिक जबाबदारी मंत्री म्हणून माझी असेल, असे नितेश राणे यांनी बोलताना सांगितले.