

सावंतवाडी : शहरातील रस्ते खोदून ते व्यवस्थित न बुजवण्याचा निष्काळजीपणा वाहनधारकांच्या जीवावर बेतू लागला आहे. सावंतवाडी-गणेशनगर परिसरात गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेला रस्ता नीट न बुजवल्याने सायंकाळी ५ वा. च्या सुमारास एका गुंडाई क्रेटा कारचा भीषण अपघात झाला.
या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशनगर भागात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते. काम झाल्यानंतर ठेकेदाराने हे चर व्यवस्थित न बुजवल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती. गुरूवारी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास या मार्गावरून जाणारी क्रेटा कार चालकाला खड्याचा अंदाज न आल्याने ती या चरात अडकली आणि अपघातग्रस्त झाली.
माजी नगरसेवक अजय गोंदावळे आक्रमक अपघाताची माहिती मिळताच माजी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून धीर दिला. यावेळी त्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. 'ठेकेदार रस्ते खोदून ठेवतात पण ते पुन्हा पूर्ववत करत नाहीत. अशा निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला.
उद्या एखादी मोठी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल श्री. गोंदावळे यांनी केला. जोपर्यंत खोदलेले रस्ते दर्जेदार पद्धतीने दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत ठेकेदाराला पुढचे काम करू देऊ नये. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील खोदलेल्या रस्त्यांची पाहणी करून दुरुस्ती करावी. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे