

आंबोली : आंबोली वर्षा पर्यटन हंगाम जोरदार सुरू असताना प्रशासन खबरदारीची तकालादु कारणे देत वर्षा पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेला आंबोली धबधबा अचानक बंद करण्या सारखे प्रकार करत आहे. रविवारी हजारो पर्यटक आंबोली घाट तसेच मुख्य धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटत असतानाच दुपारी अचानकच आंबोली धबधबा येथील एका वाकलेल्या झाडाचे कारण देत खबरदारी म्हणून पर्यटकांसाठी बंद केल्याचे शासनाने जाहीर केले. यामुळे हजारो पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला. पर्यटक तसेच स्थानिक व्यवसायिकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरवर्षी मान्सूून दाखल झाल्यावर जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात आंबोली मुख्य धबधबा व घाटातील इतर धबधबे प्रवाहित होतात. यंदामान्सून मे महिन्याच दाखल झाला. त्यामुळे आंबोली मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. सहाजिकच आंबोलीत दररोज वर्षा पर्यटकांची गर्दी होत आहे.
रविवारीही आंबोली मुख्य धबधब्यावर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. आंबोलीतील महादेवगड पॉइंट, कावळेसाद पॉइंट, नांगरतास धबधबा, बाबा धबधबा (चौकुळ - कुंभवडे) येथेही पर्यटकांची गर्दी होती. शनिवार पासूनच सर्व हॉटेल्स, होम स्टे फुल्ल झाले होते. मुख्य धबधब्यावर पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत असताना पोलिस प्रशासनाकडून अचानक भर गर्दीच्या वेळेत आंबोली धबधबा पर्यटनासाठी बंद केल्याचा आदेश काढण्यात आला. धबधब्याच्या ठिकाणी एक वाकलेले झाड यासाठी धोकादायक असल्याचे कारण देण्यात आले.
यामुळे पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला. अशा प्रकारांनी आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला प्रशासनाचे ग्रहण लागते की काय? अशी चर्चा जोर धरत आहे.