

आंबोली : ‘आंबोली वर्षा पर्यटन’ हंगामाची यंदा 1 जूनपासून सुरुवात झाली होती. मात्र, पावसाला जोर नसल्याने आंबोली मुख्य धबधबा प्रवाहीत झाला नव्हता. मात्र, गेले दोन दिवस होत असलेल्या जोरदार पावसामुळे रविवार (दि. 15) आंबोली धबधबा प्रवाहीत झाला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या 3-4 दिवसांत आंबोली धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत होणार आहे. त्यामुळे देशभरातील वर्षा पर्यटकांसाठी ही मोठी खुशखबर आहे. दरम्यान, रविवारी (दि.15) हजारो पर्यटकांनी आंबोली वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. पर्यटकांनी केलेल्या गर्दीमुळे तसेच पोलिसांचे योग्य नियोजन नसल्याने आंबोली घाटमार्गात मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे पर्यटकांनी प्रशासनाच्या कारभारावर नारजी व्यक्त केली.
दरवर्षी मान्सून दाखल झाल्यावर साधारण जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात आंबोली मुख्य धबधबा तसेच घाटातील इतर सर्व धबधबे प्रवाहीत होतात. मात्र, यंदा मान्सून मे महिन्यातच दाखल झाला असून, सध्या आंबोलीत दमदार पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे आंबोली धबधबा म्हणावा तसा प्रवाहीत झालेला नव्हता. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता.
आता मात्र गेले दोन दिवस कोसळणार्या जोरदार पावसामुळे अखेर रविवारपासून आंबोली मुख्य धबधबा प्रवाहीत झाला असून पावसाचा जोर असाच राहिला तर येत्या काही दिवसात वर्षा पर्यटनाचा मुख्य आकर्षणाचा केंद्र असलेला आंबोली मुख्य धबधबा हा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत होणार आहे. त्यानंतर खर्या अर्थाने वर्षा पर्यटन हंगाम बहरेल.
आज रविवारी नेमका आंबोली धबधबा प्रवाहीत झाल्यामुळे आंबोलीत आलेल्या हजारो पर्यटकांनी मुख्य धबधब्यावर मोठी गर्दी केली होती. या बरोबरच आंबोलीतील महादेवगड पॉइर्ंट, कावळेसाद पॉइर्ंट, नांगरतास धबधबा, बाबा धबधबा (चौकुळ - कुंभवडे) येथेही पर्यटकांची गर्दी दिसून येत होती.
यंदाचा वर्षा पर्यटन हंगाम हा 1 जून ते 15 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. त्यामुळे येणारे सर्व वीकेंडस् व सार्वजनीक सुट्ट्यां दिवशी आंबोलीत पर्यटकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी पर्यटकांनी आंबोलीतील हॉटेल्सचे आगाऊ बुकींग केले आहे.
वर्षा पर्यटन हंगामानिमित्त काही दिवसांपूर्वीच पोलिस प्रशासनाने नियोजन बैठक घेतली होती. मात्र, त्याचे प्रत्यक्षात नियोजन होताना दिसले नाही. आंबोली मुख्य धबधब्यासह घाटमार्गात ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडीचे चित्र होते. त्यामुळे अनेक पर्यटक तसेच आंबोली घाट मार्गातून प्रवास करणारे प्रवासी यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. याबाबत पर्यटक व प्रवाशांनी प्रशासनाच्या कारभारावर नारजी व्यक्त केली.