

सावंतवाडी : चौकुळ- आंबोली-गेळे वनजमीन प्रश्न सुटला असून जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभागाला सुनावणी लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ३५ सेक्शनखालील बन जमिनीचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी झुम मिटींगद्वारे दिली. गेली अडीच वर्षे या प्रश्नी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती, ती स्थगिती मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी उठविल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रश्न मी सोडवू शकलो असे सांगत त्यांनी याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांचेही आभार मानले.
येत्या चार दिवसात आडाळी एमआयडीसीमध्ये २५० नोकऱ्या देणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचा करार एक ते दोन दिवसांत होईल तर सावंतवाडी एसटी स्टँडचे डिझाईन बदलून ते बीओटी तत्वावर बांधण्यासाठी निविदा काढण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.
ना. केसरकर म्हणाले, माटणे येथे १०० एकर सरकारी जागेवर एमआयडीसी सुरू करण्याचा विचार असून आडाळी एमआयडीसीत फार्मा इन्डस्ट्री हब तयार करण्यात येणार आहे. फार्मा कंपन्या या ऑरेंज झोनमध्ये येतात असेही त्यांनी यावेळी सांगितले. गेली २५ वर्षे प्रलंबित वेळागर येथील ताज पंचतारांकीत हॉटेलचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असून स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार ९ हेक्टर जमीन वगळून काम सुरू करण्यात येणार आहे. तर अतिरिक्त भरपाईचे वाटप भूमिपूजनाच्या दिवसापासून करण्यात येईल. यातून या भागाचा पर्यटन विकास होईल. पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.