

सिंधुदुर्ग : एकीकडे कोकणात आपल्या गावी घरच्या गणपतीच्या प्रतिष्ठापनेला कसे पोहोचायचे या काळजीने ग्रासले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक यापुढे मुंबईकर चाकरमान्याला ‘चाकरमानी’ न म्हणता कोकणवासीय म्हणा असे आदेश देवून टाकले. प्रवासाचे सगळे प्रश्न सोडून उपमुख्यमंत्र्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हा आदेश दिल्यामुळे याची उलट सुलट चर्चा कोकणात रंगली आहे. मुंबईतून गावी आलेला चाकरमानी मात्र आम्हाला ‘चाकरमानी इलो’ असेच म्हणा असे आवर्जुन सांगतो आहे.
काय, कुणी, कशी मागणी केली आणि उपमुख्यमंत्र्यांनी अचानक हा निर्णय घेवून टाकला याचा उलगडा सुरूवातीला कोकणवासीयांना झाला नाही. गणपती सणाला ‘मध्येच काय हे’ असा प्रश्न चाकरमान्यांनी उपस्थित केला. रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत काही संघटनांची बैठक झाली. या बैठकीत सरकार दरबारी मुंबईकर चाकरमान्यांना चाकरमानी न म्हणता कोकणवासीय म्हणावे अशी मागणी केली. चाकरमानी हा शब्द अपमानास्पद आहे असा दावा या संघटनांनी केला. तटकरे यांनी ही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर ठेवली. नाहीतरी खा.सुनील तटकरे यांच्या मागणीकडे तसा दुर्लक्ष करण्याची स्थिती सध्या नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ निर्णय देवून टाकला. यापुढे शासन दरबारी चाकरमानी हा शब्द न वापरता कोकणवासीय हा शब्द वापरावा असे आदेश दिले. लवकरच त्याचे परिपत्रक निघणार आहे.
ही बातमी बाहेर पडल्यानंतर कोकणात चर्चा सुरू झाली. खरेतर मुंबईत राहणार्या या चाकरमान्यांना चाकरमानी असे संबोधावे ही कोकणात राहणार्या लोकांची गरज आहे. मुंबईत या चाकरमान्यांना कुणी चाकरमानी म्हणत नाही. ते गावी आले की गावात राहणारे लोक ‘चाकरमानी इलो’ असे म्हणतात. अर्थात हे संबोधन तसे सन्मानपूर्वकच आहे. आपला गाव सोडून नोकरीसाठी मुंबईला जाणार्या, तिथेच स्थायिक होणार्या आणि गणपती, होळी सणाला आणि उन्हाळी सुट्टीला आवर्जुन आपल्या गावी येणार्या मुंबईकरांसाठी हा चाकरमानी शब्द वापरला जातो. चाकर या शब्दाचा अर्थ नोकरी आणि मानी या शब्दाचा अर्थ इमानी असा मानला जातो. त्यातूनच चाकरमानी हा शब्द तयार झाला आहे.
चाकरमान्यांची अनेक मंडळे मुंबईत आहेत. ही मंडळे आपल्या गावाच्या विकासासाठी सतत कार्यरत असतात. एवढेच नव्हे तर मुंबईत अशी अनेक शिक्षण मंडळे स्थापन झाली आहेत की ज्यांनी आपल्या गावात शाळा सुरू केल्या आहेत. गावातला जत्रोत्सव असो की एखादे सार्वजनिक काम असो, या कामांसाठी चाकरमानी आपल्या पाठीशी आहेत असा विश्वास गावात राहणार्या लोकांना असतो. गावातल्या लोकांच्या अपेक्षेप्रमाणे मुंबईत नोकरी करून कमावलेल्या कमाईचा काही हिस्सा हे चाकरमानी आपल्या गावाच्या भल्यासाठी खर्च करतात. म्हणूनच मुंबईतून येणार्या या चाकरमान्याला चाकरमानी असा सन्मानपूर्वक शब्द वापरला जातो.
उपमुख्यमंत्र्यांनी आदेशात म्हटल्याप्रमाणे चाकरमानी ऐवजी कोकणवासीय असा शब्द वापरावा. मुळात कोकणात आपल्या गावात राहणार्या लोकांना कोकणवासीय म्हणतात. मग मुंबईतून गावी येणार्या मुंबईकर चाकरमान्यांना कोकणवासीय कसे म्हणता येईल? त्यात पुन्हा प्रसारमाध्यमे आणि शासनाच्या अनेक उपक्रमामध्ये मुंबईकर चाकरमानी असा शब्दही वापरला जातो. मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी मुंबईकर ‘चाकरमानी’ असे म्हटले तरी चालते, ते सन्मानानेच म्हटले जाते अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांकडे नोंदवली आहे. कोकणात येणारे बहुतांश चाकरमानीदेखील आम्हाला चाकरमानी म्हणा, चालेल, कोकणवासीय कशाला म्हणायला हवे? असा प्रश्न उपस्थित करतायेत. आता राज्य सरकार म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार या आदेशाचे रूपांतर परिपत्रकात करणार का? असे लेखी आदेश काढले तर कोकणवासीयांची काय भूमिका राहील आणि चाकरमान्यांना काय वाटेल हे लवकरच कळेल.
आम्ही कोकणवासीय आहोत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि कोकणवासीय किंवा चाकरमानी ह्यामध्ये न पडता आम्ही गावात ‘चाकरमानी’ म्हणूनच जातो, आम्हाला कोकणवासिय ह्या नावाची ओळख गरज नाही , कारण आमच्या भाषेवरून आम्ही कोकणाले आहोत ते समजतेच. त्यामुळे जी ‘चाकरमानी’ म्हणून ओळख आहे तीच सार्थ आहे. मूळात कोणवासीय आणि ‘चाकरमानी’ या पेक्षा शब्दात अडकण्यापेक्षा सण, उत्सवासाठी आपल्या मूळगावी जाणार्या गणेशभक्तांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जास्त गरज आहे. मुंबई- गोवा महामार्गाचे काम अर्धवट आहे. महामार्गावर ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होत आहे. याकडे शासनाने जास्त लक्ष द्यावे. राजेश धुरी, वाडीवरवडे -कुडाळ ( सध्या रा. मुंबई)
आम्ही खरंतर कोकणातील आहोत. परंतू गेली अनेक वर्ष आम्ही नोकरीनिमित्त मुंबईला राहतो. कोकणच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. सण उत्सवानिमित्त प्रत्येक जण आपापल्या गावी ‘चाकरमानी’ म्हणूनच जातो. त्यामुळे मुंबईकर ‘चाकरमानी’ हा शब्दच अधिक सुलभ वाटतो.
प्रसाद गावडे, मोचेमाड , ता. वेंगुर्ले ( सध्या रा. मुंबई )
कोकणवासीय आणि ‘चाकरमानी’ यात कोकणवासिय हाच शब्द साजेसा आहे. चाकरमानी बोलण योग्य नाही, कारण कोकणी माणूस हा नोकरी, व्यवसाय, कामासाठी मुंबईला जातो. मग कोकणी माणूस म्हणून चाकरी करण्यासाठी नाही. त्यामुळे आम्हाला कोकणवासीय असंच बोल तरी चालेल आणि ते आम्हा कोकणवासियांसाठी अभिमानास्पद आहे.
विश्वनाथ सुर्वे, डिगस- सुर्वेवाडी, ता. कुडाळ ( सध्या रा. मुंबई)
शासनाने जो निर्णय घेतला आहे तो एका प्रकारे चांगलाच आहे. परंतु गेली अनेक वर्षापासून चाकरमानी हा शब्द लोकांच्या मनात बिबंला आहे. ‘कोकणवासीय’ या शब्दाचा स्वीकार करायला थोडा वेळ लागेल.
संजय गोताड, विरार, मुंबई (मूळ रा. संगमेश्वर).
शासनाने कोकणवासीय म्हणण्याबाबत जो निर्णय घेतला आहे. तो थोडा चुकीचा आहे. कारण पूर्वीपासून चाकरमानी हा शब्द प्रचलीत आहे. या शब्दामध्ये एक आपलेपणा आहे. त्यामुळे चाकरमानी हा शब्दच बेस्ट.
दीपक घाणेकर, गोरेगाव मुंबई ( मूळ रत्नागिरी)