

आचरा : आचरा-सिमांबा येथील रामेश्वर विकास सोसायटी आवारात शुक्रवारी भर दुपारी बिबट्या घुसल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांची चाहूल लागताच बिबट्या नितीन गावकर यांच्या घराच्या परीसरात झेप घेत त्यांच्या अंगणात दाखल झाला व बाजूच्या कुपेरी डोंगराच्या घनदाट जंगलात निघून गेला.
दुपारी जेवण आटोपून घराच्या गॅलरीत बसलेल्या अनुष्का मुननकर हिच्या नजरेत सोसायटीच्या मुख्य रस्त्याने चालत जाणारा हा बिबट्या आला. त्यांनी आपले सासरे गणपत मुननकर यांना ही गोष्ट दाखवली. दरम्यान, रस्त्यावर विरुद्ध बाजूने येणार्या मोटारसायकलच्या आवाजाने बिबट्याने लगतच्या नितीन गावकर यांच्या घराच्या आवारात उडी घेतली व तो अंगणात दाखल झाला.
श्री. गावकर यांच्या घरात भाड्याने राहणारे राठोड कुटुंबीय अंगणात अचानक आलेला बिबट्या पाहून हादरले. प्रसंगावधान राखत त्यांनी तत्काळ घराचे दरवाजे बंद करून घेतले. मात्र बिबट्या तेथे फार वेळ न थांबता तो लगतच्या कुपेरी जंगलात निघून गेला. दरम्यान सोसायटी आवारात बिबट्या घुसल्याचे रहिवाशांनी पत्रकार परेश सावंत यांना संपर्क करत सांगितले. तसेच याबाबत वनविभागास खबर देण्यास सांगितले.
परेश सावंत यांनी वन विभागाला संपर्क करत या घटनेची माहिती दिली. यानुसार वनविभागाचे जलद कृती दलाचे पथक आचरा येथे दाखल झाले. श्री. गावकर यांच्या घराच्या परीसरात बिबट्याच्या पायाचे ठसे उमटलेले दिसून आले. या बिबटयाची खबर कळताच सरपंच जेरॉन फर्नांडिस, अर्जुन बापर्डेकर, परेश सावंत, सचिन गावकर, ग्राम महसूल सेवक गिरीश घाडी, उदय बापर्डेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सोसायटी रहिवासी उपस्थित होते.