

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी-करमळगाळू येथील जेसीबी चालक दीपक विठ्ठल पालकर (38) यांनी राहत्या घराच्या माळीवर छपराच्या लोखंडी बाराला नायलॉनच्या दोरीने तोंडात फडका कोंबून गळफास लावून जीवन संपविले. ही घटना गुरुवारी स.6 वा.च्या सुमारास निदर्शनास आली. त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही.
दीपक पालकर व कुटुंबीय बुधवारी रात्री जेवण आटोपून झोपले होते. दीपकचा भाऊ पहाटे बाथरूमला जाण्यासाठी बाहेर आला असता त्यांना घराचा मागचा दरवाजा उघडा दिसला. दरवाजा कोणी उघडा ठेवला म्हणून त्यांनी घरातल्या सर्वांना उठविले. त्यावेळी दीपक कुठे दिसला नाही. कुटुंबीयांनी दीपकची शोधाशोध सुरू केली. दीपकच्या मुलीने वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दीपकच्या मोबाईलच्या रिंगचा आवाज घराच्या माडीवर येऊ लागला. तो आवाज ऐकून दीपकची मुलगी माडीवर धावत गेली, त्याठिकाणी दीपक गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. हे द़ृश्य पाहून तिने हंबरडा फोडला. तिचा हंबरडा ऐकून कुटुंबीय तसेच शेजार्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. दीपक यांने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या तोंडात फडका कोंबला होता.
या घटनेची माहिती मिळताच निवती पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, माजी सरपंच सचिन गावडे, माड्याचीवाडी रायगाव पोलिसपाटील शेखर परब, मडगाव पोलिसपाटील हरेश वारंग, गोंधयाळे पोलिसपाटील सौ. खुल्ली यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. दीपक यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कुडाळ येथे आणण्यात आला होता. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दीपक हा चांगला जेसीबी ऑपरेटर होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.