

प्रवीण शिंदे
दापोली : पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर ‘बीच सॅक’ ही अभिनव संकल्पना राबवण्याचा शासनाचा मानस होता, परंतु या संकल्पनेला जवळपास पाच वर्षे उलटली तरी ती संकल्पा अद्याप लालफितीतच अडकल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळात या योजनेची सुचवणूक करण्यात आली होती. पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) च्या माध्यमातून या प्रकल्पाला गती देऊन स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती साधण्याचा उद्देश होता. मात्र आजतागायत ना ठोस आराखडा, ना प्रत्यक्ष अंमलबजावणी, परिणामी पर्यटनविकासाचे स्वप्न फक्त फाइलांपुरतेच मर्यादित राहिले आहे.
मुरुड किनारा हा निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असून, येथे डॉल्फिन सफारी, जलक्रीडा आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी लाखों पर्यटक आकर्षित होतात. या पार्श्वभूमीवर बीच सॅक संकल्पना स्थानिकांसाठी रोजगाराचे मोठे साधन ठरली असती, पण शासकीय उदासीनतेमुळे ती अधांतरीच राहिली आहे.
स्थानिक विराज खोत यांच्या मते, ‘दापोली, मुरुड, कर्दे, हर्णे यांसारख्या किनाऱ्यांवर पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी सुसंगत पद्धतीने बीच सॅक उभारले गेले, तर कोकण पर्यटनाला नवे रूप मिळेल आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराचे नवे दार खुले होईल. निसर्गाचा तोल न बिघडवता पर्यटन वाढवण्याचा हा प्रयत्न शासनाने प्रत्यक्षात उतरवला, तर दापोली तालुक्यातील समुद्र किनारे ‘कोकणचा गोवा’ ठरू शकतात, असा स्थानिकांचा विश्वास आहे.