

Hindi- Marathi Row MNS
खेड: मीरा भाईंदर येथील मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यास परवानगी नाकारून आज पहाटे पोलिसांनी अचानक अटक केल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मनसे नेते प्रकाश महाजन, वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी उतरून आंदोलन केले. यावेळी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी प्रकाश महाजन म्हणाले, राज्यातील अमराठी भाषिकांची मते मिळवण्यासाठी मराठी लोकांवर दडपशाही सरकार करत आहे. या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात राहणारे अन्य सर्व भाषिक इथले होऊन राहत आहे. मात्र काही ठराविक बिहार, उत्तर प्रदेश आझमगड आदी भागातील लोक येथे येऊन राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अमराठी लोकांना चिथावणी देत असल्याचे मीरा भाईंदर येथे निघालेल्या अमराठी लोकांच्या मोर्चावरून सिद्ध झाले आहे. मात्र अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मराठी माणूस पक्षभेद बाहेर पडून एकवटतो हे आज अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर झालेल्या मोर्चातून सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले