

Mira Bhayandar MNS Morcha
मीरा-भाईंदर : अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेचा आज मंगळवारी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा बालाजी हॉटेल ते मीरा रोड पूर्व असा नियोजित होता. पण मोर्चाच्या भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. व्यापाऱ्यांचा मोर्चा निघतो, आमची गळचेपी का? अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. मनसे मोर्चावर ठाम आहे. दरम्यान, यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर मोर्चाआधीच मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संपूर्ण शहरातील चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान, मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी का नाकारली? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''जो मोर्चाचा मार्ग आहे तोच घ्यावा. त्याच मार्गाने मोर्चा निघावा. पण त्यांना विशिष्ट मार्गाने मोर्चा काढायचा होता. यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता, यामुळे पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही,'' असे फडणवीस यांनी सांगितले. योग्य मार्गाने मोर्चा काढणार असाल तर परवानगी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले
मी पोलिसांना विचारले परवानगी का दिली नाही?. तर मला आयुक्त बोलले की ते वेगळा मार्ग मागत होते. पोलिसांनी त्यांना सांगितले की तुम्ही नेहमीचा मार्ग घ्या. कुणालाही मोर्चा काढायचा असेल तर परवानगी मिळेल. पण आम्हाला मोर्चा असाच काढायचा आहे, तसाच काढायचा आहे. असे त्यांचे म्हणणे होते. ते काल म्हणाले की आम्हाला सभा घ्यायची आहे. ती परवानगीदेखील त्यांना दिली होती. मोर्चा काढायला कुणालाही ना नाही. पोलिसांनी त्यांना सातत्याने सांगितलं की तुम्ही मार्ग बदला. पण त्यांना विशिष्ट मार्गानेच मोर्चा काढायचा होता, असेही फडणवीस म्हणाले.
या घडामोडीवर प्रताप सरनाईक यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. गेली चार वेळी मी आमदार आहे. हे एक शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. आताच मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे कारवाई नको. व्यावसायिकांचा मोर्चा झाला तर मग मराठी एकीकरण समितीला का परवानगी दिली नाही? असा सवाल प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला.
कार्यकर्त्यांना घरातून उचलणे याला माझा विरोध आहे. मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहे. तिकडे पोलीस धरपकड करत आहेत. जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र आधी मोर्चा होऊन द्यायला पाहिजे होता, असे सरनाईक म्हणाले.