

रत्नागिरी : तालुक्यातील आरेवरे येथील समुद्र किनारी फिरण्यासाठी गेलेल्या ठाणे मुंब्रा येथील 4 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 6.30 वा घडली. यात तीन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्मा शामशुद्दीन शेख (१८) आणि उमेरा शामशुद्दीन शेख (२९) या दोघी आपल्या नातेवाईकांकडे रत्नागिरीत आल्या होत्या. शनिवारी सायंकाळी त्या दोघी जैनब जुनैद काझी (२६) आणि जुनैद बशीर काझी (३०) यांच्यासोबत आरेवरे समुद्रकिनारी फिरायला गेल्या.. समुद्र खवळलेला होता. त्यातच दुपार पासून पावसाला सुरुवात झाली होती.
समुद्रात पावसामुळे लाटा उसळत होत्या, तरीही चौघांनी पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही. अचानक आलेल्या प्रचंड लाटांनी त्यांना समुद्रात ओढले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी एकमेकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
काही प्रत्यक्षदर्शीनी आरडा ओरडा सुरु केला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांनी बुडत असणार्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचेही प्रयत्न असफल ठरले. सायंकाळी 7 वा त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले होते.