मुंबई : वरळी येथील लोटस जेट्टी येथे शनिवारी अस्थिविसर्जन करण्यासाठी गेलेल्या संतोष विश्वेश्वर (51), कुणाल कोकाटे (45) या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर संजय सरवणकर (58) जखमी झाले. शनिवारी सायंकाळी 5.40 वाजता ही दुर्घटना घडली.
गेल्या दोन दिवसांपासून समुद्राला मोठे उधाण आले आहे. उंच लाटा उठत असल्याने नागरिकांना आणि पर्यटकांना समुद्र बीचवर जाण्यास बंदी घातली आहे. तरीही ही बंदी झुगारून हे सर्व जण समुद्रात गेले होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हाजीअलीजवळील वरळी येथील लोटस जेट्टी येथे शनिवारी अस्थिविसर्जनाचा विधी सुरू असताना लाटांच्या प्रवाहासोबत तिघेजण वाहून गेले. यावेळी समुद्रावर उपस्थित असलेल्या लोकांनी आरडाओरड केली. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आले.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तिघांना पाण्यातून बाहेर काढले. तिघांनाही नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. तर एक जखमीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.