

रत्नागिरी : चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील ग्रामीण भागात विकासाचा नवा उजेड पसरला आहे. 310 सौर पथदिव्याद्वारे 12 गावांतील 114 वाड्यांचे शाश्वत विद्युतीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमामुळे हजारो ग्रामीण नागरिकांच्या जीवनात सुरक्षितता, प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. डॉ. सचिन शिगवण यांनी स्वखर्चातून हा प्रकल्प उभारून देशाच्या विकासाला हातभार लावला आहे.
हा प्रकल्प निर्मिती फाउंडेशन आणि ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रा. लि. व टीयुव्ही-एसयुडी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला असून, संपूर्ण भारतात ‘द सोलार मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. सचिन शिगवण यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा उपक्रम 3 नोव्हेंबर रोजी सुरू होऊन 15 नोव्हेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण करणार आहेत.
या प्रकल्पांतर्गत चिपळूण तालुक्यातील मांडकी खुर्द, पालवण, आगवे, वीर, देवपाट, तोंडली, नायशी, वडेरु आणि पेढांबे ही गावे तसेच संगमेश्वर तालुक्यातील आंबव, नारडुवे आणि शिरंबे ही गावे सहभागी होती. ग्रीन इंडिया इनिशिएटिव्हच्या तांत्रिक टीमने प्रत्येक गावाचे सर्वेक्षण करून आवश्यकठिकाणी सौरपथदिव्यांची उभारणी केली आहे. प्रकल्प यशस्वितेसाठी सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला.